जत,प्रतिनिधी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरता झालेल्या विविध चळवळींमुळे, तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सांमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मूलभूत स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. तसेच या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या कक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे महत्त्व भारतानेच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे, असे प्रतिपादन डॉ सतिशकुमार पडोळकर यांनी जतच्या राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने मौजे बनाळी ता. जत येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्या भारतभर विविध संघटना व विद्यार्थ्यांचे सरकारच्या विरोधात नागरीकता संशोधन कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व कायदा याविरोधात आंदोलन व घोषणाबाजी सुरू असून यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना काही सरकारी पुरस्कृत संघटनेकडून ट्रोल करण्यात येत आहे. हा कायदा राजघटनेचे उल्लंघन करत असल्याने विद्यार्थी या विरोधात उतरले आहेत. याविरोधात आवाज उठविणाऱ्या युवकांचा आवाज दडपण्याचा सरकार वेगवेगळ्या यंत्रणेकडून प्रयत्न करत आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना घाणेरड्या शिव्या, मारहाण व मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करून त्यांना पाकिस्तानात जाण्याविषयी सांगण्यात येत आहे. खोट्या राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांमध्ये धार्मिक विद्वेषाची भावना निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यातच धन्यता मानली जात आहे. शासन, धर्मसंस्था आणि समाज वेगवेगळे समाजघटक वेळोवेळी आपली सत्ता अथवा प्राप्तस्थानाचे निरंकुशत्व जपण्याकरिता विरोधी विचारांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अथवा विरोधी विचार नामशेष करण्याकरिता अथवा तो सामान्यजनांपर्यंत न पोहोचु देण्याच्या दृष्टीने पहिला बळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.करांडे,बी.एम.डहाळके
जत येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.सतिशकुमार पडोळकर सोबत प्रा. तुकाराम सन्नके, संतोष जगताप व ग्रामस्थ