आम्ही दुष्काळी भागात राहणारी माणसं . दुष्काळाच्या झळा निमुटपणे सहन करित जगणारे.महापूराचा थरार आमच्या स्वप्नातही कधी अनुभवला नाही. टीव्ही आणि सोशल मीडियात महापूराची दृशे पाहिली.मात्र त्याहून कितीतरी विदारक व भयावह चित्र आज प्रत्यक्ष पाहिलं.पुरूष व महिला भगिनींचे आश्रू पाहून,आम्हालाही हुंदका आवरणे कठीण झाले.
मेंढेगिरी येथील आमचे बंधू विनोद शिवनूर यांनी रायजिंग सन इंग्लिश मेडियम स्कूल सुरू केले आहे.शाळेतील लहान विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरातील गावांत फिरून मोठी मदत गोळा केली.
चिवडा,लाडू यांची दीड हजार पाकीटे, तीन हजार बिस्कीट पुडे,टोस्ट,12 पोते तांदूळ,डाळ,लाह्या असे साहित्य जमा केले होते.मी संस्थेचे संचालक महेश शिवनूर व पिकअप चालक आम्ही तिघेच मदत घेऊन गेलो. अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर,जिल्हाध्यक्ष जालिंदर हुलवान,मटाचे पत्रकार नामदेव भोसले, साहित्यक व सेवाभावी शिक्षक दयासागर बन्ने व त्यांचे सहकारी शिक्षक असे सर्व मिरजमध्ये जमलो.मिरज पंचायत समितीच्या मदत कक्षात तांदुळ व डाळी दिल्या.मिरज कोल्हापूर रस्त्यावर ट्रकच्या रांगा लागल्या आहेत.पाच दिवस ट्रक थांबून आहेत.त्या चालकांना खाऊची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.
पुढे निलजी येथे गेलो.नदीकाठचा हा सधन भाग जलमय झाला आहे.निलजी शाळेत विस्थापितांची राहण्याची सोय केली आहे.अनेक घरे जलमय झाली आहेत.संसार महापूराच्या हावाली करून नागरिकांनी जीव वाचविला आहे.काही ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले,जनावरे बाहेर काढली. अंगावर शहारे आणणारे प्रसंग ऐकायला मिळाले.त्यांचे दु:ख डोंगराएवढे होते. तर आमची मदत म्हणजे एक केवळ आशेचा किरण होती.नागरिक व महिलांना आपल्या वेदना सांगताना हुंदका आवरत नव्हता.नकळत आमचे डोळेही पाणावले.आपल्या मदतीला कुणीतरी येतय, माणसांत माणुसकी जिवंत आहे. हे पाहून त्यांचे मन गहिवरत आहे. साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचा त्यांनी अनुभव घेतला आहे.पूरग्रस्तांचे सर्वस्व उध्वस्त झाले आहे. खरेच त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे.
दिनराज वाघमारे
पत्रकार,जत