जत | चिमुकल्याच्या निवेदनाने नगरपरिषदेला दाखविला आयना |

0
2

जतच्या मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांना जत सुधारा म्हणून निवेदन द्यायची वेळ

जत,प्रतिनिधी : जत शहराची खालावलेली प्रतिमेमुळे आम्हालाही वेदना होत आहेत.आम्ही मॉडर्न स्कूलमध्ये शिकतोय,मात्र खड्डे,अस्वच्छता यामुळे आमचे आरोग्य बिघडत आहे.त्यावर तातडीने उपाय शोधा असे निवेदन जत येथील मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेला दिले.मुर्दाड यंत्रणा,बेजबाबदार पदाधिकारी यामुळे कित्येक निवेदने,आंदोलने करूनही शहरातील परिस्थिती सुधारलेली नाही.त्यामुळे शहरातील चिमुकल्यांनी नगरपरिषेदला आतातरी हे चित्र बदला म्हणत निवेदन देऊन पदाधिकाऱ्यांना वास्तविकता दाखविली आहे.

आम्हाला जत मॉडर्न हवे आहे, स्वच्छ पाणी द्या, खेळायला बगीचा द्या, आपले जत स्वच्छ व सूंदर ठेवा, भाजी विकणाऱ्या काका, काकूंना भाजी मंडईत बसवा आदी मागण्या करत जत येथील मॉडर्न नर्सरी स्कुल येथील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल- रुक्मिणी व वारकरांच्या वेशात थेट नगरपरिषद गाठली. 

जत शहरातील मॉडर्न नर्सरी स्कूलच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी चिमुकल्यांची वारकऱ्यांची दिंडी काढली जाते. याही वर्षी  मॉडर्न स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी काढली.शाळेपासून निघालेली दिंडीने सोलनकर चौक, महाराणा प्रताप चौक, बाजार पेठ  मार्गे नगरपरिषद गाठली.या दिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील मुले विठ्ठल, रुक्मिणीसह वारकऱ्यांच्या वेषात होते तर त्यांच्या हाती जतच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधणारे बॅनर होते. नगरपरिषदेसमोर दिंडीतील चिमुकल्यांने जतच्या कळीचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या पदाधिकाऱ्यांना जतच्या वास्तविक काय स्थिती आहे.यांचा आरसा दाखविला.  

दिंडीत विठ्ठल बनलेला मल्हार रविंद्र मानवर व रुक्मिणी बनलेली काशवी संतोष मठपती यांच्यासह वारकरी बनलेल्या चिमुकल्यांनी विविध मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा बनन्नेवर यांच्याकडे दिले. 

चिमुकल्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मॉडर्न नर्सरी स्कुलचे विद्यार्थी असून आम्हाला जत मॉडर्न हवे आहे, गाड्याची गर्दी थांबवण्यासाठी मला पोलीस मामा पाहिजे,आम्हाला खेळण्यासाठी बगीचा हवा,आम्हाला शहरात डांबरी रस्ते हवेत,कचरा पेटीचे नियोजन व्हावे,आजूबाजूचा परिसर डासमुक्त व्हावा,आमच्यासारखी अजून असंख्य मुले शाळेबाहेर आहेत,त्यांना शाळा मिळावी,रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या काका,काकूंना भाजी मंडईत बसवा,प्यायला शुद्ध पाणी पाहिजे, जत शहर स्वच्छ व सुंदर पाहिजे. चिमुकल्यांच्या या दिंडीने अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

चिमुकल्यांची ही आगळीवेगळी दिंडी यशस्वी करण्यासाठी मॉडर्न नर्सरी स्कुलच्या संस्थापिका सविता सोलापुरे, मुख्याध्यापिका श्रीदेवी सोलापुरे  यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.या दिंडीमुळे जतची काय अवस्था आहे.हे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातून तरी पदाधिकारी बोध घेतात का बघुया…

मॉडर्न नर्सरी स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडीने येत नगरपरिषदेला विविध मागण्याचे निवेदन दिले. 

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here