जत,प्रतिनिधी : उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसतशी विहिरी, धरणो, पाझर तलावांनी तळ गाठला आहे. परिणामी उभी बागायती पिके, जनावरे जगविण्यासाठी विहिरीत उभी-आडवी बोअर घेऊन पाण्याचा शोध घेतला जात आहे. जमिनीवरदेखील बोअरवेल करण्याचे प्रमाण वाढल्याने जमिनीची अक्षरश: चाळण होत आहे. उन्हाळ्यात सर्वच परिसरातील शेतकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या बागायती पिकांना व जनावरांना जगविण्यासाठी प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने पाणी आणण्यासाठी प्रयन्त करत आहे म्हणून आपल्या शेतातील विहिरीत किंवा पडीत जागेत मिळेल, तिथे पाण्यासाठी बोअरवेल करत आहे. जत तालुका डोंगराळ असल्याने पाण्याऐवजी खडकाची राखच मिळत आहे.
पाण्याचा शोध घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाण्याचा शोध मात्र लागत नाही. सद्यस्थितीत जत तालुक्यात विहिरीच्या खोदकामासह बोअरवेल करण्याचा धडाका शेतकर्यांनी लावला आहे. कायमस्वरूपी पाण्याचा शोध घेण्यासाठी शिवारात विहिरी खोदकामासह बोअरवेल पाडण्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. पाण्याच्या शोधासाठी शेतकर्यांची जिवघेणी स्पर्धा सुरू असल्यामुळे जमिनीची चाळण होत आहे, तरी पाण्याचा थेंबदेखील लागत नसल्याने शेतकर्यांसह व्यावसायिकदेखील हतबल झाले आहेत. शेतकर्यास विहीर खोदणे, बोअरवेल पाडणे परवडत नसले, तरी आपली हक्काची विहीर असावी, यासाठी प्रत्येक छोटा शेतकरीही विहीर खोदकामास पसंती देत आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी त्याने ठेवली आहे. विहीर खोदून अथवा बोअर करून पाणी लागेलच याची खात्री नाही. त्यात कधी यश येते, तर कधी अपयश येते.
जमिनीत किती खोल विहीर असावी, परिसरात बोअरवेलची संख्या किती असावी, याला बंधने आहेत; मात्र अधिकार्यांना चिरीमिरी दिली की, सर्व नियम शिथील होतात. उतार्यावर विहीर, बोअरवेलचीदेखील नोंद होते. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीत मात्र हात सैल सोडावा लागतो. वाढत्या उन्हामुळे विहिरी कोरड्याठाक झाल्याने अशा वेळी विहिरीचे काम करणो सोपे जाते. अशा वेळी जमिनीत उभे आडवे बोअरवेल करण्यासह विहिरी खोल करण्यास महत्त्व दिले जात असून, सद्यस्थितीत तालुक्यात हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यासाठी तामिळनांडू, कर्नाटक राज्यातील बोअरवेलधारक तालुक्यात मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. तसेच परिसरातील शेतमजूर विहीर खोदकामाचे थेट टेंडर घेत असल्याने अशा टेंडर पद्धतीने विहीर खोदण्याला शेतकरी पसंती देत आहेत.दरम्यान, या धरणाच्या तालुक्याला पाण्याच्या ठोक उपाययोजनांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र हातावर हात धरून बसले आहेत. |
भविष्यातील पाण्याची अडचण रोखायची असल्यास, जलसंधारणाच्या लहान-मोठय़ा कामांना जाणीवपूर्वक मोठा निधी दिली पाहिजे. दुष्काळ निवारणाच्या दीर्घकालीन योजना हाती घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयोग करणार्या जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाचीही जोड द्यावी आणि पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याच शिवारात अडविण्यासाठी लोकचळवळ निर्माण करावी लागेल. त्या चळवळीसाठी पुढाकार घेणे ही काळाची आहे.
मन्सूर खतीब,माजी सभापती,पंचायत समिती,जत