जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या मासिक सभेत गैरहजर शिक्षकावरून जोरदार वादावादी झाली.या मुद्यावर सभागृहास व्यवस्थित माहिती न दिलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी.शिंदे यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बिडिओ वाघमळे यांनी बजावली.
जत पंचायत समितीची मासिक सभा सभापती शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, दिग्विजय चव्हाण, मनोज जगताप, रविंद्र सांवत,आप्पा मासाळ अश्विनी चव्हाण,सुंनदा तावशी आदी सदस्य उपस्थित होते.
वळसंग मधील एक शिक्षक नेहमी सतत गैरहजर असतो,शाळेत वेळेत येत नाही.सहाय्यक नेमणूक केली जाते. या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सदस्या चव्हाण यांनी सभागृहात केली.यापूर्वी लेखी तक्रार केली होती.शिक्षणाधिकारी त्यांना पाठिशी घालतात,त्यांचे लागेबांधे आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.त्यावर शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे यांनी त्यांची माहिती नसल्याचे सांगितले.त्यावर चव्हाण संतप्त झाल्या तुम्ही त्यांना पाठिशी घालताय काय अशी विचारणा केली.त्यावर पुन्हा शिंदे यांनी मी पाठिशी घालत नाही.तुम्हाला माझ्यावर काय कारवाई करायची ती करा असे उद्धट उत्तर दिले.त्यावर गटविकास अधिकारी वाघमळे यांनी हस्तक्षेप करत शिंदे यांना सभागृहास व्यवस्थित माहिती दिली नसल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची नोटीस काढण्याचे आदेश दिले.
दिग्विजय चव्हाण यांनी 14 वित्तआयोगाचा वर्ष संपत आले तरी ग्रामपंचायतीनी निधी खर्च केला नसल्याचे सभागृहात प्रश्न उपस्थित केला.व तालुक्यातील ग्रामपंचायतीची माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली. तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीनी आराखडा, व 13 ग्रामपंचायतीनी निधी खर्च केला नसल्याचे समोर आले. गटविकास अधिकारी वाघमळे यांनी त्यावर आज बैठक घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.