जत,प्रतिनिधी:वैशाख म्हटले की हमखास पुरण पोळी आणि बांधावरील आंब्याचा आमरस हा बेत निश्चित असायचा! अक्षय्य तृतीयेला आमरसावर ताव मारूनच आंब्याच्या हंगामाची सुरूवात केली जायची, मात्र यावेळी गावरान आंबा दुर्मीळ झाला आहे. परिणामी 1500-2000 रुपायापर्यत दर असल्याने अक्षय्य तृत्तीयेला आंब्या विना साजरी करण्याची वेळ आली. शेतातील बांधावर आंब्याची झाडे आता संख्येने कमी होऊ लागली आहेत. फार पूर्वी नाही पण 15 – 20 वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागामध्ये शेताच्या बांधावर आंब्याची झाडे मुबलक असायची. अपवाद वगळता प्रत्येकाच्या शेतात स्वतःचे एखादे तरी आंब्याचे झाड असायचे. शेतकरी दुपारची विश्रांती तर आंब्याच्या गर्द सावलीतच घ्यायचे. मात्र गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड गावरान आंब्याच्या महाकाय झाडांच्या अस्तित्वावर उठली आहेत. या वृक्षतोडीतूनच आंब्याची झाडे कमी होऊ लागली आहेत.खरे तर उन्हाळ्याच्या दिवसात गावामध्ये बहुसंख्य घरांत आंब्याची आढी ठरलेली असायची. आढीतील आंबे खाणे आता दुर्मीळ झाले आहे. या हंगामात जी आंब्याची झाडे शिल्लक आहेत, त्यांनाही वाढते तापमान, अवकाळी पावासाचा तडाखा, ढगाळ वातावरण आदींमुळे फळधारणा झालेली नाही.बेसुमार वृक्षतोड, हवामानातील बदल, शेतामध्ये महागड्या औषधांचा वाढता वापर यामुळे ग्रामीण भागातून दिवसेंदिवस आंब्याची झाडे कमी होऊ लागली आहेत. गावरान आंब्याच्या रसाची मेजवानी काळाच्या पडद्याआड लोप पावू लागली आहे.