जत – शहर प्रतिनिधी : उन्हाळा सुरू झाल्यानंतर पारा जसजसा वाढतो तसा कुलर विक्रीचा व्यवसायही तीन महिने तेजीत असतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळीच आहे. पारा चाळीस अंशावर जाऊन पोहोचलेला आहे; परंतु पाण्याची टंचाई असल्याने कुलर विक्रीची मागणी मंदावली आहे.
मागच्या वर्षी दुष्काळ असला तरी पाण्याची कमतरता फारशी जाणवली नाही. त्यामुळे कुलर विक्रीचा व्यवसाय तेजीत होता. मात्र, यावर्षी पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असल्यामुळे कुलरची मागणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच घटली आहे. बाजारपेठेतील डेझर्ट प्रकारच्या कुलरसह ब्रँडेड कुलरची मागणी कायम असते. कुलर्सला पाणी अधिक लागते. कुलरच्या आकारमानानुसार पाणी लागते. सध्या पिण्याच्या पाण्याची मारामार असताना कुलरमध्ये पाणी टाकण्यास कुठून आणायचे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे विक्रीत घट झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून असलेला दुष्काळ कुलर विक्रीच्या मुळावर आला असल्याचे एका कुलर व्यावसायिकाने सांगितले.
शहरासह तालूक्यात पाणी टंचाई शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, रंगपंचमी संपल्यानंतर पारा थेट चाळीस अंशावर जाऊन पोहोचला आहे. एरवी मे महिन्यात पारा चाळीस अंशावर जाऊन स्थिरावल्याचे यापूर्वी समोर आले आहे; परंतु यावर्षी दुष्काळ असल्यामुळे तापमान लवकरच उच्च पातळीवर गेले आहे.
झंकार इलेक्टॉनिक्स मालक पंतग चव्हाण म्हणाले,
गरमी वाढली असली तरी कुलरच्या विक्रीत म्हणावी तशी तेजी नाही. गेल्या वर्षी कुलरच्या किमतीत वाढ झाली होती; परंतु यंदा भीषण पाणी टंचाईचा विपरित परिणाम कुलर विक्रीवर झाला आहे. त्यामुळे कुलर कमी किमतीत विकावे लागत आहेत.





