(मिरवाड ता.जत येथील माळरानावर उताराला श्रमदानातून बांध घालताना विद्यार्थी)
जत,(प्रतिनिधी)-
“माझी माती,माझी माणसं”, “माझं गावं, माझा देश” ही भावना प्रत्येकाने उराशी बाळगली तर नक्कीच आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही…ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास.
आणि हाच विकास साधायचा झाला तर तो शेतीला मुबलक पाणी असल्याशिवाय शक्य नाही. कायमचा दुष्काळी भाग म्हणून जतला नेहमीच हिणवले जाते पण याच जतला पाणीदार बनवायचे असेल तर प्रत्येक गावाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याशिवाय हे शक्य होणार नाही,याची कल्पना आता जत तालुक्यातल्या आबाल-थोरांना आली असल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्काळी जत तालुका पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे पुढे सरसावली आहेत. यात गावांमधील शाळेतील मुलेदेखील मागे नाहीत. पश्चिम भागातील डफळापूरजवळील मिरवाड सारख्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले गाव पाणीदार बनवायचे ही भावना उराशी बांधून आपणही आपली शाळा व शाळेच्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे हीच गाठ मनाशी बांधून “पाणी फाऊंडेशन” अंतर्गत पाणी आडवा, पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे श्रमदानातून गावानजिक बांध घातला.सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी आणि डफळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले यांनीही मिरवाडच्या डोंगराळ भागावरील उतार असणाऱ्या भागात सहा दगडी बंधारे घालण्याची किमया केली आहे. पाणी आपल्याच गावात अडवून ठेवण्यासाठी नक्कीच या बंधाऱ्यांचा उपयोग येणाऱ्या पावसाळ्यात होईल, अशी भावना मुलांची दिसत आहे.
यावेळी केंद्रप्रमुख शंकर बेले , विजयकुमार कदम, निरंजन नागरे,मंदाकिनी सोनवणे ,अमिना मुल्ला, वहीदा नदाफ , फरहाना मकानदार, सरपंच आण्णाप्पा चव्हाण, ग्रा.पं. सदस्य सागर सवदे, रावसो सवदे यांच्यासह पालकदेखील उपस्थित होते





