जत, प्रतिनिधी : जत तालुक्यात दिवसेंदिवस सावकारीचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. धनदांडगे सावकार राजरोसपणे गोरगरिबांना लूटत असल्याचे चित्र आहे. तर अनेक ठिकाणी सावकारी कोण करीत आहे हे माहित असून देखील पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. जिल्हाधिकारी विजय काळम- पाटील यांनी वाळूतस्करांना पायबंद घातला, त्याप्रमाणे या फोफावलेल्या सावकारांच्या देखील मुसक्या आवळाण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आता कारवाईची गरज बनली आहे.
सावकारांच्या दडपशाहीमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. जत शहराची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. येथील शेतकर्यांच्या आणि अनेक व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा मोठ्या आहेत.व्यवसायाच्या गरजा आणि कुटुंबाच्या अडचणी भागविण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी हेलपाटे मारून बेजार झालेल्या व्यापारी व त्यांच्या कामगारांना ‘लक्ष्य’ करून करून येथील बाजारपेठेत सावकारी बोकाळली आहे. अगदी पानपट्टी पासून मोठ्या व्यापारापर्यंत सावकारीचा उद्योग सुरु असल्याचे स्पष्ट चित्र दिसते.विशेष करून सबरजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी- विक्री व्यवहारात हे सावकार किंवा त्यांचे हस्तक वावरताना दिसतात.
राष्ट्रीयकृत बँका किवा सहकारी बँका सहजासहजी कोणाला कर्ज देत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या वेळी सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्यायच राहत नाही, याचाच फायदा हे सावकार घेत आहेत.
तालुक्यात सावकारी फोफावली आहे. अनेक ठिकाणी अगदी नोकरदारांपासून ते अवैध मार्गाने पैसे मिळवून सावकारी व्यवसाय करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.अल्पकालावधीत कमी कष्टातून श्रीमंत होण्याचे स्वप्न उरी बाळगून गोरगरीब शेतकरी आणि नवखे व्यापारी यांची यातून पिळवणूक होत आहे. सावकारीत दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. याबाबत पोलिसांना माहिती असून देखील जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते.तालुक्यात सावकारी परवानाधारक मोजकेच आहेत. जिल्हाधिकारी विजय काळम- पाटील यांनीच आता या बेलगाम सावकारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.





