खड्डे मुजवायला प्रवाशाच्या मरणाची वाट बघताय काय?
जत तालुक्यातील महामार्गासह सर्वच रस्त्यावर खड्डे बनलेत मुत्यू मार्ग : जिल्हाअधिकाऱ्यांच्या सुचनेनंतरही प्रशासन हालेना

जत,वार्ताहर:गुहागर-विजापूर आणि जत-चडचण,जत-सांगली,जत-शेगाव,जत-बिंळूर,जत-उमराणी,जत-येळवी,उमदी-विजापूर व जाड्डरबोबलाद-कोतेंबोबलाद या राज्यमहामार्ग रस्ते उरले उरलेच नाहीत, त्यामुळे खड्याचा मार्ग म्हणायची वेळ प्रवाशावर आली आहे. रस्त्याची एवढी दुरावस्था झाली आहे.तरीही संबंधित अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने मरणयातना सोसायची वेळ आली आहे.रस्त्यांकडे पाहिल्यास राज्यशासन आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतायत असा प्रश्न पडतो. टेंडरचे कमिशन वेगळे, कामाची गुणवत्ता दाबून न्यायचे कमिशन वेगळे, रस्ता दुरूस्ती वर्षातून एकदाच करायची,आणि खर्ची दुरूस्तीचे टेंडर मात्र अनेकवेळा दाखवायचे. रस्त्यावरील खड्डयांमुळे रोज किती अपघात होतात, किती लोक अपंग होतात ? अनेकांचेे किती पैसे दवाखान्यात खर्च होतात. याला ताळमेळ राहिला नाही. अनेकांनी कर्ज काढून घेतलेली वाहने खड्डयांमुळे खिळखिळी होत आहेत. वाहनांचे आयुष्य कमी होत आहे. वाहनदुरूस्तीला लाखो रूपये खर्च होत आहेत. गर्भवती महिला दवाखान्यापर्यंत पोहचणे मुश्किल होत आहे, दररोज या रस्त्यावरून प्रवास करणार्या लोकांना कायमचा कंबर आणि मणक्याचा आजार जडत आहे. हे सर्व पाहिल्यास भ्रष्ट अधिकार्यांना शासकीय नोकरीचा पगार, वेतन आयोग कमी पडतोय का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. जनतेचा खर्च होणार्या लाखो रूपयांचे काय ? याचा विचार करा. प्रवासी जनतेच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोणाची ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या मार्गावर रहदारी करणार्या गणेश मंडळांने वर्गणीतून 4-5 ठिकाणी मुरूमाचे ट्रेलर टाकून काही प्रमाणात खड्ड्यातून मुक्तता केली होती. मात्र राज्य महामार्गावर असे खड्डे राज्याची किंबहुंना जत बांधकाम विभागाच्या प्रतिमा मलिन करण्यासारखे असल्याचे ग्रामस्थाचे आरोप आहेत.