संख मध्यम प्रकल्प 8 वर्षानंतर ओव्हरफ्लो
परिसरातील 50 गावांतील दुष्काळी शेतकरी सुखावला : प्रकल्पा खालील गावांच्या शेतीला पाणी पुरवठा होणार
संख,वार्ताहर : जत तालुक्यातील सर्वात मोठा व पुर्व भागातील संखसह परिसरातील शेतकऱ्यांना वरदान असणारा संख मध्यम प्रकल्प तब्बल 8 वर्षानंतर ओव्हरफ्लो झाला आहे. गत पंधरवड्यात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस झाल्याने विस्तिर्ण असणाऱा संखच्या या प्रकल्पाच्या साडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्या पाण़्यामुळे प्रकल्पाखालील बोर नदी लगतच्या तालुक्याचे अखेरचे गाव असणाऱ्या सुसलाद पर्यत पाणी पोहचणार आहे. गेल्या सलग दहा वर्षापासून अत्यल्प पावसामुळे परिसरातील सर्वच गावांना सलग दहा वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी ट्रँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. जिल्ह्यातील मोठ्या तलावापैंकी एक असणाऱ्या या प्रकल्पामुळे परिसरातील शेती बारा वर्षापुर्वी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तलावातील पाणी साठा पाहून वाळवा शिराळा,तासगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी तलावा लगत शेती खरेदी करून बागा फुलविल्या होत्या. परिसरात त्यावेळी मोठे वलयं आले होते. द्राक्षे,डांळीब,फळाच्या बागा,ऊस,हळद,सह हंगामी शेती बहरल्या होत्या. शेतकरी सुखी होता. मात्र सर्व काही व्यवस्थित चालले असताना कुणाची तरी नजर लागली व वरूण राजा परिसरावर रुसला त्याचा रुसवा तब्बल बारा कायम राहिल्याने पाऊसच पडला नाही. तब्बल बारा वर्षे संख तलाव,बोर नदी पात्र कोरडे राहिले. त्यामुळे परिसरातील हिरवी शेती नष्ठ झाली.शेतकरी संपला पिकेच गायब झाली. पाण्यासाठीही टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले होते. मात्र गेल्या पंधरवड्यात रिटर्न मान्सूनच्या तुफान पावसाने परिसरातील चित्र बदलले आहे. पुन्हा संख मध्यम प्रकल्पाच्या साडव्यातून पाणी वाहू लागले आहे. तलावाचे विस्तर्ण पात्र फुल्ल झाले आहे.यामुळे पुन्हा एकदा संख परिसराला तालुक्यात नवी ओळख मिळणार आहे. यापुढे किमान तीन वर्षे पाणी पुरवठा होईल इतका साठा या जलाशयात झाला आहे. पाणी टंचाई संपली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही यामुळे निकाली निघाला आहे. परिसरातील शेतकरी आंनदात आहे.
काळ्या तस्करीला आळा बसणार
गेल्या दहा वर्षात पावसाने बगल दिल्याने हिरवी शेती किंबहुंना शेतकरी नष्ठ झाला. मात्र कोरड्या पडलेल्या बोर नदी पात्रात काळ्या सोन्याची(वाळू) तस्करी बेफाम वाढली आहे.नदीत पन्नास फुटापर्यत खड्डे पाडून वाळू काढण्यात आली आहे. मात्र तलावात वाढलेला पाणीसाठ्या मुळे बोर नदी पात्रात पाणी बरेच दिवस थांबणार आहे. शिवाय जलाशय भरून वाहू लागल्याने सुसलाद पर्यत नदी पात्र भरून वाहणार असल्याने किंबहुंना काहीदिवस तरी वाळू तस्करीला प्रतिंबध लागणार आहे.
बारा वर्षात पहिल्यांदाच संख मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.






