काँग्रेसला ऊर्जा,तर राष्ट्रवादीला चिंतनाची गरज भाजपला जनतेची नाराजी भोवली

0
2

काँग्रेसला ऊर्जा,तर राष्ट्रवादीला चिंतनाची गरज

भाजपला जनतेची नाराजी भोवली

जत,(प्रतिनिधी):जतसह सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगलेच यश मिळाल्याने मोठी ऊर्जा मिळाली आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच  कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला असून बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करण्यासाठी नेते,कार्यकर्त्यांना मोठी शक्ती मिळाली आहे.मात्र ही मंडळी याचा कसा वापर करून घेतात,हे पाहावे लागणार आहे. राष्ट्रवादीला पडझडीला सामोरे जावे लागले आहे तर भाजपसाठी इशारा देणारी निवडणूक ठरली आहे.सांगली जिल्ह्यात 453 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. थेट लोकांमधून सरपंच निवड असल्याने या निवडणुकीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जात होते. सरपंच उमेदवाराशिवाय अन्य सदस्य उमेदवारांकडे फारसे लक्ष नसल्याचे जाणवले.पण सत्ता येण्यासाठी सदस्यांची गरज असल्याने खुद्द सरपंच पदाच्या उमेदवारांना आपल्या सगळ्याच गोतावळ्यांना बरोबर घेऊन जाणे भाग पडले.या निवडणुकीत लोकसभा,विधानसभा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात परके झालेल्या काँग्रेसला आता ऊर्जितावस्था आली आहे. काँग्रेसला दीडशेच्यावर ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीनेही काही तालुक्यात चांगले यश मिळवले असले तरी तिथे पडझड झाल्याचेच दिसून येत आहे. शंभरच्या आसपास या पक्षाला यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात जयंत पाटील आणि सुमनताई पाटील यांच्यारुपाने दोन आमदार आहेत. जयंत पाटील यांच्या मतदारसंघात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चांगलेच आव्हान उभे केले होते. त्यात त्यांना बर्‍यापैकी यहशी मिळाले आहे.

सुमनताई पाटील यांच्या मतदारसंघातही खासदार संजय पाटील यांनी कडवे आव्हान उभे करत भाजपला चांगले यश मिळवून दिले.राष्ट्रवादीला पलूस-कडेगाव,जत, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात चांगलाच फटका बसला आहे. सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीला पडझडीला सामोरे जावे लागले आहे.राष्ट्रवादीला तासगाव तालुक्यातल्या गावांना मुकावे लागले आहे. वाळवा आणि तासगाव वगळता राष्ट्रवादीला आलेले यश पक्षासाठी धोक्याचा इशारा आहे.

लोकसभा,विधानसभा आणि पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा सुसाट सुटलेला वारू या ग्रामपंचायत निवडणुकीतही वेगाने धावेल, असेच भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटत होते,मात्र तसे झाले नाही. या सुसाट वारूला ब्रेक लागला आहे.मिरज तालुक्यात भाजपला चांगले यश मिळाले असले तरी काँग्रेसकडे सक्षम नेता नसतानादेखील काँग्रेसला मिळालेले यश वाखाणण्यासारखे आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पुढची लढाई लढण्यास त्यांना ताकद मिळाली आहे.जत तालुक्यात भाजपला म्हणावे असे यश मिळाले नाही.काँग्रेसने इथे सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

खानापूर– आटपाडी मतदारसंघात आमदार अनिल बाबर यांना यश मिळवणे अवघड वाटत होते. कारण त्यांना माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख,गोपेचंद पडोळकर,माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या समर्थकांनी चारी बाजूने घेरले होते.तरीही दोन्ही तालुक्यात आमदार बाबर समर्थकांनी 30 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे.शिवसेनेला पहिल्यांदाच ग्रामीण स्तरावर इतके मोठे यश मिळाले आहे.शिराळ्यात सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला,त्यानंतर भाजपला आणि तिसर्‍याक्रमांकावर काँग्रेसला यश मिळाले आहे.इथे पक्षीय राजकारणापेक्षा गावकी-भावकीचे राजकारण अधिक झाले. अगोदरच दहा ग्रामपंचायती बिनविरोध आल्या होत्या.एकूण काय तर जिल्ह्यात भाजपचा सुसाट सुटलेला वारू काँग्रेसने नुकताच रोखला नाही तर आपलेच नाणे कसे खणखणीत आहे,हेही दाखवून दिले. आता काँग्रेसने हाच उत्साह कायम ठेवत जिल्ह्यात विस्कटलेली पक्षाची घडी बसवण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. आपल्या बालेकिल्ल्यात मिळालेले यश त्यांना ऊर्जा देणारे आहे.राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज आहे तर भाजपाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठे कमी पडलो,हे पाहावे लागणार आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here