जत बाजारपेठेला खासगी सावकारीचा विळखा
पीडितांनी पुढे येण्याची गरज ; फिटता फिटेना कर्ज : वीस ते तीस टक्क्यांनी व्याज आकारून व्यापारी, जनतेची लूट

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील जत मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी स्थानिकांपेक्षाही परगावाहून आलेले व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांकडे काम करणारा कामगारवर्गही शेजारील गावा-गावातून तसेच परराज्यातून रोजीरोटीसाठी आलेला आहे. बाजारपेठेमध्ये नव्याने आलेल्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा मोठय़ा आहेत. व्यवसायाच्या गरजा भागविण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी हेलपाटे मारून बेजार झालेल्या व्यापारी व त्यांच्या कामगारांना टार्गेट करून येथील बाजारपेठेत खासगी अनधिकृत सावकारी बोकाळली आहे. बाजारपेठेतील बरेच छोटे-मोठे व्यापारी या खासगी सावकारांच्या विळख्यात अडकले आहेत.
जत बाजारपेठेमध्ये फर्निचर, टिंबर मार्केट, हॉस्पिटल्स व हॉटेल व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे. या व्यवसायांमध्ये नव्याने आलेल्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. हे नवखे व्यावसायिक व त्यांना असलेली तातडीची आर्थिक गरज ओळखून हे खासगी सावकार त्यांना वीस ते तीस टक्क्यांनी पैसे पुरवून त्यांची गरज भागवतात. व्यापारीसुध्दा गरजेपोटी अशा रकमा घेतात; परंतु या पैशांचा परतावा करताना मात्र मेटाकुटीला येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या व्यापार्यांना दहा हजार रुपयांची परतफेड करताना सावकारास सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागत आहेत.
एका हॉटेल कामगाराने माहिती दिली की, दोन वर्षांपूर्वी त्याने एका खासगी सावकाराकडून दहा हजार रुपये घेतले आहेत. आजपर्यंत त्याने पंचवीस हजार जमा करूनही मुद्दलीचे चार हजार रुपये वसुलीसाठी सावकाराने तगादा लावला असल्याचे सांगितले.
सर्वसामान्य अशिक्षित जनतेबरोबरच सुशिक्षित वर्गही गरजेपोटी झटपट पैशांच्या मोहात या प्रकाराला बळी पडत आहे. गरजेपोटी खासगी सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या एका शिक्षकाने सांगितले की, पैसे देताना गोडी-गुलाबीने बोलणारे हे सावकार पैशांची वसुली करताना मात्र दंडेलशाहीचा वापर करतात. प्रसंगी मारहाण करून दामदुप्पट पैशाची मागणी करून ती वसूल करतात. अशा प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्यापर्यंतच्या धमक्याही दिल्याच्या घटना घडल्या आहेत.पीडितांनी समाजासमोर पुढे येऊन याची खुलेआम चर्चा करणे गरजेचे आहे. समाजातील स्वत:च्या प्रतिष्ठेचा विचार न करता या अत्याचाराला तोंड फोडण्याची गरज असून प्रसंगी अशा खासगी सावकारांना कायद्याचा बडगा दाखविण्याची गरज आहे. बँकांची भूमिकाही महत्त्वाची..
जतमध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका तसेच सहकारी पतसंस्था असतानाही व्यावसायिक व सर्वसामान्यांना खासगी सावकारीकडे का जावे लागत आहे, याचा या सर्व बँका आणि पतसंस्थेच्या जबाबदार अधिकारी व पदाधिकार्यांनी विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये बोकाळलेल्या या खासगी अनधिकृत सावकारीपासून व्यावसायिक व सर्वसामान्यांना कशाप्रकारे मुक्त करता येईल, तसेच कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. गरजेपोटी घेतलेल्या पैशांवर वीस ते तीस टक्क्यांनी व्याजाने पैसे घेणारी खासगी सावकारी म्हणजे बाजारपेठेला लागलेली कीड आहे. सेंट्रल राष्ट्रीयीकृत बँकेनी व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठय़ा गरजा ओळखून वेगवेगळ्या शासनाच्या आर्थिक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांचा लाभ जनतेेला मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.