शेतकर्यांच्या आयुष्यात रोषणाई उजळणार कधी?
शेतकर्यांच्या घरी पणती लावायलाही तेल नाही:मग दिव्यांच्या लखलखाटात शेतकर्यांचे आयुष्यात प्रकाश कधी?; काळजाला पिळ पाडणारा प्रश्न
जत,का.प्रतिनिधी:याही वर्षी पाऊस लांबल्याने कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला जत तालुक्यातील शेतकऱ्याच्या दुष्काळ हटण्याचे नाव घेताचे चित्र नाही.कायम अनिश्चित पाऊसाने आजही येथील पाणी टंचाईने जनता होरफळून निघाली आहे.त्यात यावर्षीही मान्सून रिटर्नने काहीशी साथ दिली आहे. मात्र वेळाने पाउस पडल्याने खरीपाचे पिक हाताला आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत. ऐन दिवाळीतही जत तालुक्यातील शेतकरी गळितगात्र झाला आहे.जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्याच्या घरात दिवाळीचा उत्साहावर विरजन पडले आहे.देशाला स्वांतञ मिळाल्यापासून येथील जनतेची पाणी मागणी संपवू न शकलेले लोकप्रतिनिधीच्या व त्यांच्या तालावर नाचून लाखो रुपयाची टेबलाखालून मिळविणाऱ्या प्रशासनाच्या अधिकारी,कर्मचाऱ्याच्या घरात मात्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होतानाचे चित्र आहे. तर दुसरीकडे आमचे प्रश्न सुटतील या आशेने निवडून देणारी जनता मात्र आहे,त्या पैशात कशीबशी स्वत:सह कुंटुबाच्या अपेक्षाना मुरड घालून दिवाळी साजरी करत आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व. दिवाळीला दिव्यांच्या रोषणाईने सारा आसमंत उजळून निघेल. सर्वत्र आनंदाचे वातावरण.जणू काही अंधारावर प्रकाशाने विजय मिळवावा अन् दिव्यांच्या झगमगाटात अनेकांचे आयुष्यच उजळून निघावे असा तो क्षण सार्यांनाच मोहीत करणारा. मात्र नापिकी अन् कर्जबाजारीने होरपळलेल्या शेतकर्यांच्या घरी पणती लावायलाही तेल नाही, मग दिव्यांच्या लखलखाटात शेतकर्यांचे आयुष्य उजळणार कधी? असा प्रश्न अनेकांच्या काळजाला पिळ पाडणारा आहे.दिवाळी वर्षातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण. मुलाबाळांना नवीन कपडे घेऊन इतरांप्रमाणे त्यांनाही दिवाळीचा क्षण अनुभवता यावा यासाठी शेतकर्यांनी केवढे स्वप्न पाहिले होते. मात्र या स्वप्नांचा शेतकर्यांच्या डोळ्यादेखत चुराडा झाला. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने शेतकर्यांना दगा दिला आणि शेतकर्यांची तेव्हापासूनच होरपळ सुरू झाली. दुबार-तिबार पेरणीने शेतकरी पूर्णत: हताश झाला. खिशात एक दमडीही उरली नाही. पुढील शेतीचा हंगाम कसा करायचा अशा विवंचनेत असताना शेतकर्यांनी उसनवारी व कर्ज काढून कशीतरी शेती पिकविली. मात्र परतीच्या पावसाने शेतकर्यांचा घात केला.ख रीप हंगामात काही प्रमाणात आलेल्या पिकाचेही दर पडल्याने उत्पादनापेक्षा खर्च अधिक वाढल्याने ‘शंभराचे साठ अन् शेतकर्यांच्या गळ्याला फास’ अशी शेतकर्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. केलेला उत्पादन खर्च भरून निघणार नाही म्हणून काही शेतकर्यांच्या व्यथा आहे.परिस्थिती भहवाह असताना कायम आश्वासन देऊन आपली पोळी भाजणाऱ्याना शेतकर्यांचे हे धकधकते वास्तव आज दिसेल काय?त्यातच सरकारच्या बहुचर्चित कर्जमाफीचेही पैसे जमा नाहीत.दिवस-रात्र शेतात राबराब राबणार्या कष्टकरी बापाला आज कुणाचाही आधार उरला नाही. उत्पादन घेऊनही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. केवळ राबणेच त्यांच्या नशिबी आले का, नापिकी अन् कर्जबाजारीने शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे. शेतमालाला योग्य भाव द्या, नाही तर मरण अशी शेतकर्यांची बिकट अवस्था झाली आहे.