..या दुचाकी शोरूम’कडून ‘आरटीओ’चे नियम फाट्यावर | पासिंग न करता दुचाकी ग्राहकांच्या ताब्यात : ‘आरटीओ’ कारवाई करणार?

0
5
तासगाव : ‘आरटीओ’च्या नवीन नियमानुसार कोणतीही गाडी पासिंग केल्याशिवाय ग्राहकांच्या ताब्यात देता येत नाही. मात्र तासगाव तालुक्यातील सावळज येथील श्री सिद्धेश्वर मोटार्स या होंडा कंपनीच्या शोरूम मालकाने ‘आरटीओ’चे नियम फाट्यावर मारले आहेत. या शोरूममधून पासिंग न करता गाड्या ग्राहकांच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. याच शोरूममधून पासिंग न करता दिलेल्या एका दुचाकीचा सोमवारी भीषण अपघात झाला.

 

 

 

 

       काही वर्षांपूर्वी ‘आरटीओ’ची नवीन नियमावली जाहीर झाली आहे. त्यानुसार पासिंग न करता एकही गाडी रस्त्यावर फिरली नाही पाहिजे, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी पासिंग न करता सर्रासपणे शोरूम मालकांकडून गाड्या ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येत होत्या. मात्र पासिंग होण्यापूर्वी सदर गाड्यांचा अपघात अथवा चोरी झाल्यास गाडी मालक व शोरूम मालकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शिवाय अपघातग्रस्त गाड्यांचा व जखमी अथवा मृत व्यक्तीचा इन्शुरन्स क्लेम करतानाही अनेक अडचणी येत होत्या.

 

 

 

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शोरूममधूनच गाडी पासिंग करून त्यानंतरच ती ग्राहकांच्या ताब्यात द्यावी, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परिणामी विना पासिंगची गाडी रस्त्यावर फिरवल्यास तो गुन्हा ठरतो. याप्रकरणी सबंधित गाडी चालक व शोरूम मालक या दोघांनाही दोषी धरले जाते.

 

 

गाड्यांच्या पासिंगबाबत ‘आरटीओ’ने नियम कडक केले असतानाही सावळज येथील श्री सिद्धेश्वर मोटार्स या होंडा कंपनीच्या शोरूम मालकाकडून या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या शोरूममधून पासिंग न करताच गाड्या ग्राहकांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

दसरा, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोक गाड्या खरेदी करतात. त्यामुळे पटापट गाड्या विकून आपल्या तुंबड्या भरण्यास चटावलेल्या शोरूम मालकांनी ‘आरटीओ’चे नियम पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. सावळज येथील होंडा कंपनीच्या शोरूममधून अक्षय डुबुले याला काही दिवसांपूर्वी दुचाकी विकण्यात आली होती. मात्र या गाडीचे पासिंग न करताच शोरूम मालकाने केवळ गाडी विकून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवत गाडीची विक्री केली होती.

 

दरम्यान, याच गाडीचा सोमवारी वायफळेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अक्षय डुबुले व रुपेश मोरे हे दोन युवक गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू असताना यातील रुपेश मोरे याचा मृत्यू झाला. तर अक्षय डुबुले हा मृत्यूशी झुंज देत आहे.

 

दरम्यान, अपघातातील दुचाकीचे पासिंग झाले नसल्याचे समोर आले आहे. हा प्रकार दडपण्यासाठी शोरूम मालकाने कालपासून धडपड सुरू केली आहे. मात्र गाडीचे पासिंग न करता ती डुबुले याच्या ताब्यात दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गाडीचे पासिंग नसल्याने जखमी अक्षय डुबुले व मृत रुपेश मोरे यांना इन्शुरन्स क्लेम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

तर गाडी पासिंग न करता ती ग्राहकांच्या ताब्यात देऊन त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या नराधम शोरूम मालकावर गुन्हा दाखल करावा, त्याचे शोरूम सील करावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत येत्या दोन दिवसात काहीजण ‘आरटीओ’कडे लेखी तक्रार करणार आहेत.

 

विना पासिंगच्या गाडीचा दुसऱ्यांदा अपघात…!
बिरणवाडी येथील अक्षय डुबुले व रुपेश मोरे हे पट्टीचे मद्यपी होते. दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवत होते. सावळजच्या श्री सिद्धेश्वर मोटार्समधून पासिंग न करता आणलेल्या गाडीचा त्यांनी चार दिवसांपूर्वी एक किरकोळ अपघात केला होता. मात्र काल या गाडीचा दुसऱ्यांदा भीषण अपघात झाला. त्यामध्ये रुपेश मोरे याचा बळी गेला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here