जत : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे जत तालुक्यातील बस सेवा ठप्प पडली असून,गुरूवारी सकाळ पासून जवळपास सर्व फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी हेळसांड झाली. एसटी महामंडळातील संघटनांनी आगार प्रमुखांना निवेदन देत बंद सुरू केला आहे.संपाला भाजपचे प्रभाकर जाधव,नगरसेवक प्रकाश माने,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत,नगरसेवक मिथुन भिसे,सूरज सगरे, किरण सगरे,शिवा माळी,सुरेश भिसे ,नारायण कदम आदींनी पाठींबा दिला.
महामंडळातील कर्मचाऱ्यांना ३ टक्के याप्रमाणे वार्षिक वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता द्यावा, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी एसटीचे कामगार आणि कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वाहक-चालक, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.सकाळपासून एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे बसस्थानक सुनसान पडले होते. प्रवासी बसची वाट पाहत आहेत.