सांगली : खंडणीचा गुन्हा दाखल होताच
पसार झालेला सराईत गुन्हेगार रतन रमेश कांबळे (रा. नवीन वसाहत) याला विश्रामबाग पोलिसांनी गजाआड केले.पसार असतानाही तो आणि त्याचा साथीदार फिर्याद देणाऱ्या व्यक्तीस गुन्हा
मागे घेण्याबाबत धमकावत होते, अशी माहिती पोलिस निरिक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी दिली.
शहरातील कॉलेज कॉर्नरनजिक असलेल्या आर्या पानशॉपच्या काऊंटरवर येवून रतन कांबळे आणि त्याचा साथीदार पवन सागर बुचडे या दोघांनी खंडणीची मागणी केली होती.पाच हजाराची खंडणी दिली नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकीही त्या दोघांनी दिली होती.
याबाबत फरारी झालेल्या आरोपीला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच रतन कांबळे हा पसार झाला. दरम्यानच्या काळात तो एका अनोळखीसह पान शॉपवर येवून फिर्यादीला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत होता. कोर्टात माझ्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे, अन्यथा तुला सोडणार नाही, असेही तो बजावत होता. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते.
सांगली,कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांत पोलिसांचे स्वतंत्र पथक रतन कांबळेचा शोध घेत होते. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून त्याला शोधण्यासाठी सायबर गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारीही सरसावले होते. अखेर रतन कांबळे हा शनिवारी नवीन वसाहतीमधील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी दरीबा बंडगर यांना मिळाली.
त्यानंतर गुन्हे प्रकरटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने सापळा लावून कांबळे याला शिताफीने पकडले.नवीन वसाहत परिसरात राहणारा आणि
पोलिसांच्या सराईतांच्या असलेला रतन कांबळे याच्यावर तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत.
रतन कांबळे याला गजाआड करणाऱ्या पथकांमध्ये सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे,आदिनाथ माने, संदीप घस्ते, एम.एन. मुलाणी, तेजस कुंभार,ऋतुराज होळकर,स्वप्नील कोळी,सर्जेराव पवार, पोपट नागरगोजे,किरण कांबळे, सायबर सेलचे प्रकाश पाटील, बिरोबा नरळे आदींचा समावेश होता.