जत,संकेत टाइम्स : जत पश्चिम भागात गावागावात देशी दारूचा महापूर वाहत असून त्यांच्या जोडीने गावठी दारूने अनेक संसार उध्दवस्त होत आहेत. पश्चिम भागातील परवाना धारक दारू विक्रेत्यांकडून गावागावातील दारू विक्रेत्यांना राजरोसपणे बॉक्सने दारू विक्री केली जात आहे.विशेष म्हणजे असा उघडपणे बाजार सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाने गांधारीची भूमिका घेतली आहे तर पोलीस हाताची घडी तोंडावर बोट स्थितीत आहेत.
डफळापूर परिसरातील गावात परवाना धारक दारू विक्रेत्यांकडूनच परिसरातील गावागावात मोठ्या प्रमाणात दारूचा बेकायदा पुरवठा केला जात असल्याचे अनेक कारवाईतून समोर आले आहे. काही महिन्यापुर्वी कोकळे येथे दारू विक्रीसाठी घेऊन जाताना परवाना धारक दुकानाच्या जवळच एका अवैध दारू विक्रेत्याला पोलीसांनी पकडले होते.शिवाय त्याने तेथूनच दारू घेतल्याचे पोलीसांना सांगितले होते.मात्र तेव्हाही उत्पादन शुल्क विभागाने नियम तोडला असतानाही अभय दिले होते.परिणामी गावागावात अंशात करण्यात असे परवाना धारक दारू विक्रेते कारणीभूत ठरत असून यामुळे पोलीसांना कायदा सुव्यवस्था राखताना कसरत करावी लागत आहे.
त्याशिवाय डफळापूर सह परिसरातील गावागावात गावठी दारूच्या भट्ट्या सुरू आहेत. या परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारूची विक्री करण्यात येते. शक्यतोवर गावात काढली जाणारी दारू गावातच विक्री करण्यात येते. मात्र, मागणी असल्यास अथवा गावात विक्री न झाल्यास दुसर्या गावात कमी दाराने दारूची विक्री करण्यात असल्याचे दिसून आले. ओढा काठावर दारूची भट्टी पेटविण्यात येते. दारू तयार करणार्यांना परिसराची भौगोलिक माहिती असते. छापा पडल्याची कुणकुण लागताच ते पलायन करण्यास यशस्वी होतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
गावठी दारूमध्ये निकृष्ट दर्जाचा गूळ, तुरटी, मोहमाच, बिबा, खापरी आदींचा वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळाले. झटपट नशेसाठी विषारी रसायनांचा व काही झाडांच्या पाल्याचा रसही या दारूमध्ये मिसळण्यात येत असल्याचे दिसून आले. हे द्रव्य शरीरासाठी सर्वाधिक हानिकारक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. किराणा दुकानांमध्येही विक्री..
जत ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम भागातील सर्व गावांमध्ये बेकायदा देशी, विदेशी व गावठी दारूची खुलेआम विक्री होत आहे. प्रत्येक गावात दुचाकीवर दारूची वाहतूक करण्यात येते. शासकीय यंत्रणांकडून होणार्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अवैध दारू विक्रेत्यांकडून वेळेवर व मुबलक प्रमाणात ‘रसद’ न मिळल्यासच कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेकदा केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन म्हणून कारवाईचा बनाव करण्यात येतो.
परिणामी कारवाईनंतर काही वेळातच विक्री जोरात सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले; मात्र काही अधिकारी-कर्मचारी दारूबंदीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले. संध्याकाळी भट्टी सुरू करायची व रात्री किंवा पहाटे विक्री करायची, अशी कार्यपद्धती असल्याचे दिसून आले. अवैध दारू विक्रेत्यांपुढे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रयत्न, पोलिसांची गस्त निष्प्रभ ठरत असल्याचे धक्कादायक चित्रही या निमित्ताने पाहावयास मिळाले.
जिल्ह्यात अवैध दारू व हातभट्टय़ांवर पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अधून-मधून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईचा परिणाम दीर्घकालीन राहत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी अवैध दारूची विक्री जोरात सुरू आहे. तरुण व्यसनाधिन होत असून, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारूबंदीसाठी अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतले. ठरावाच्या प्रतीही प्रशासनाकडे दिल्या. मात्र, दारूबंदी झाली नाही. काही सामाजिक संघटनांनी तर मेळावे घेऊन दारूबंदीचा मुद्दा लावून धरला.
काहींनी तर आंदोलनाचे हत्यारही उपसले. मात्र, तरीही दिवसेंदिवस अवैध दारूची विक्री व हातभट्टय़ांचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रशासनाने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने अँक्शन मोडमध्ये येणे आवश्यक आहे,