३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पब किंवा क्लब मध्ये जाऊन पार्टी करणे, दारू पिऊन, गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, सायलंसरच्या पुंगळ्या काढून आवाज करणे, मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे, डीजेच्या किंवा लाऊडस्पीकरच्या तालावर नाचणे यासारख्या गोष्टी केल्या जातात.
यावर्षी कोरोनामुळे शासनाने यावर बंदी आणली असली तरी काही महाभाग लपून छपून का होईना या गोष्टी करणारच आहेत. नववर्षाचे अशा प्रकारे स्वागत करणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा भंग करणे. दारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची फॅशन आहे. दारू पिऊन गाडी चालवताना बऱ्याचदा अपघात होतो त्यात काही जण मृत्यू पावतात तर काही जण जखमी होतात, काही तर कायमचे जायबंदी होतात.
दारू पिऊन गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब रस्त्यावर येते. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःसह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे. म्हणूनच नववर्षाचे स्वागत करताना स्वतःसोबत इतरांना त्रास होणार नाही याचे भान सर्वानी ठेवावे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना बंधनाची ऐसीतैशी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. नववर्षाचे स्वागत म्हणजे चांगल्या-वाईट गोष्टी दूर सारून नववर्षाच्या सूर्योदयाच्या साक्षीने नवसंकल्पाचा अवलंब करणे, त्याचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागणे.
यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करताना पाश्चत्यांचे अंधानुकरण बंद करुन प्रत्येकाने चांगले काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा आत्महत्या करीत आहे. देशाचे रक्षणकर्ते जवान दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होत आहे. २०२० व २०२१ या वर्षात कोरोनाच्या महामारीने अनेकांचा रोजगार गेला. हजारो कुटुंबाने स्थलांतर केले. काहींच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. काहींच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावून नेला. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. ऑनलाइन अभ्यासाची साधने नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होती. दारूच्या नशेत नववर्षाचे स्वागत करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच शहिदांच्या मुलांना मदत करुन आपण नववर्ष साजरे करू शकतो.
कोरोनाने रोजगार हिरावलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करुन, दिव्यांग-अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन, गोरगरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक पुरवून आपण नवीन वर्ष साजरे करू शकतो. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा जाणवत आहे नवीन वर्षाची सुरवात जर रक्तदानाने केली तर एखादया रुग्णाचा प्राण वाचवल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते. नवीन वर्षात अवयव दानाचाही संकल्प आपण करू शकतो.
गोरगरीब आणि गरजवंताना त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना हवी ती मदत केल्यास, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आपण निर्माण करू शकतो. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करुन देणारे ठरू शकतात, त्यामुळे स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक
समृद्ध व अर्थपूर्ण होऊ शकते.
“जुने जाऊ दया मरणालागूनी,
जाळुनी किंवा पुरुन टाका….”
या कवितेच्या ओळीप्रमाणे मागील वर्षाच्या सर्व चांगल्या-वाईट भावना पुसून नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधीलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा संकल्प करीत नववर्षाचे स्वागत केले तर, नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५