तासगाव : तासगाव व नागेवाडी कारखान्याची बिले दिली जात नाहीत. हे गेल्या वर्षभरापासून ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना टोलवले जात आहे. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची अजूनही कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. ही बिले तातडीने द्या, नाहीतर तासगावच्या चौकात शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. खासदार संजय पाटील यांनी मोर्चातील शेतकऱ्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना मात्र हे आश्वासन मान्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला.तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची सुमारे 18 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. गेल्या वर्षभरात बिलाचे तुकडे पाडत देणी भागवली आहेत. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील बिलाचे 15 तारखेचे चेक शेतकऱ्यांना दिले होते. मात्र ते वटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मात्र चिंचणी नाक्यात पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्याठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली.
पोलीस खासदारांच्या घराकडे जाऊ देत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. दरम्यान,शेतकऱ्यांनी आक्रमक होत गंभीर इशारा दिला. त्यानंतर काही वेळातच खासदार आंदोलनस्थळी आले. यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी खासदारांना फैलावर घेतले. आमच्या चुली बंद पडायची वेळ आली आहे. सोसायट्या थकल्या आहेत. सावकार घरी हेलपाटे मारत आहेत. तर कोणाला दवाखान्यात, कोणाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे आहेत, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांनी सांगितल्या.
यावेळी खासदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी आजपर्यंत मला समजून घेतले आहे. माझ्याकडून चूक झाली आहे. बिल द्यायला थोडासा वेळ होतोय. पण मी मुद्दाम करीत नाही. अनेक आर्थिक अडचणीतून मार्ग काढतोय. इतक्या दिवस सहकार्य केलेत अजून फक्त 2 तारखेपर्यंत सहकार्य करा. सर्वांचे पैसे दिले जातील. पण, मोर्चा काढून, आंदोलने करून, स्टंटबाजी करून शेतकऱ्यांनाच त्रास होईल. माझ्या घरावर दगडे टाकून जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर मी स्वतः तुम्हाला माझ्या गाडीतून घरी नेतो.
पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना त्रास व्हावा, ही माझी भूमिका नाही. पण आर्थिक अडचणीतून मार्ग काढताना अडथळे येत आहेत. पण, येत्या 2 तारखेपर्यंत सर्वांचे पैसे भागवले जातील. जर माझ्याकडे पैसे असते तर मी जाणीवपूर्वक आपणास त्रास दिला नसता. मला माहित आहे, संसारासाठी पैसा लागतो. पण, शेतकऱ्यांनी निश्चित रहावे. 2 तारखेपर्यंत कोणाचेही पैसे ठेवणार नाही.
सर्व शेतकरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चाने गेले. याठिकाणी जोपर्यंत बिले मिळत नाहीत तोपर्यंत ठिय्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला.