जत,संकेत टाइम्स : जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चबुत-यावर बसविण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ पुतळा अखेर जत शहरात दाखल झाला आहे.मिरज येथे समितीचे अध्यक्ष,सदस्य व प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर अखेर मुर्ती जतमध्ये आणण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र प्रत्यक्षात मुर्ती चबुतऱ्यावर बसविण्यासाचा निर्णय आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर ठरणार आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांनी गनिमी कावा करत रविवारी सायकांळी १०० मावळ्यासह मिरज येथे पोहचत पुतळा जतमध्ये आणण्यात यश मिळविले आहे.
जत शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांज धातूचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. जत नगरपरिषदेने आर.सी.सी. मध्ये चबुत-याचे बांधकाम केले आहे. या जागेवर गेली पंधरा वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नसल्याने शिव प्रेमतीतून संताप व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसापासून या चर्चांना उधान आले होते.
या संदर्भात जतचे माजी आमदार विलासराव जगताप यानी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समिती स्थापन केली. या समितीमध्ये सर्व जातीधर्माचे, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना घेतले.या मध्ये विद्यमान आ.विक्रमसिंह सावंत यांच्या बरोबरच प्रकाश जमदाडे, डाॅ.रविंद्र आरळी, श्रीपाद अष्टेकर, शिवाजीराव ताडसर, सुभाष पाटील, मल्लीकार्जुन सगरे,सुभाष गोब्बी, उमेश सावंत, प्रभाकर जाधव, सुधिर चव्हाण आदींचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीने लोकवर्गनीतून सोळा लाख रूपये गोळा करून ती रक्कम मूळचे जत तालुक्यातील असलेले मिरज येथिल शिल्पकार गजानन सलगर यांना दिली होती.सलगर यांनी मुर्ती तयार केली आहे.
ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती समितीने दि.२५ जानेवारी २०२२ रोजी मिरज येथून जतमध्ये आणून त्या मूर्तीची जत शहरातून सवाद्य मिरवणूक काढून त्यानंतर ही मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चबुत-यावर बसविण्याचे सर्व प्रकारे नियोजन केले होते.
परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती जतमध्ये आणण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाने मूर्तीकार श्री. सलगर यांना महाराजांची मूर्ती कोणालाही न देण्याविषयी लेखी नोटीस दिली.
यामागे राजकीय संदर्भ लावले जात होते.मात्र छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीने ठरल्या वेळेत आणून कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही मूर्ती जतमध्ये आणून त्याची स्थापना करणार असा निर्धार करून समितीने यासंदर्भात कोणाचाही मूर्ती आणण्याला व मूर्तीची स्थापना करण्याला विरोध नाही या करिता जत शहरासह तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना यांचा पाठींबा असलेली पत्रे घेतली. व ती सर्व पत्रे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्याकडे सादर केली आहेत.
दरम्यानच्या काळात आ.श्री. विक्रमसिंह सावंत यांनी ही आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आणण्याला विरोध नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवरून विरोधकानी राजकारण करणे बंद करावे व माझ्याबरोबर जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणणे व येणारे दि.१९ फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी त्याची स्थापना करणे यासाठी जिल्हाधिकारी श्री अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची विनंती केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमीनी जतला कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा आणायचाच असा निर्धार करून शनिवारी दुपारी तीन वाजता एक गुप्त बैठक घेऊन मिरज येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती गनिमीकाव्याने जतला आणण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी यानी पंधराविस चारचाकी वाहने व एक आयशर बरोबर घेऊन मिरज येथिल मूर्तीकार गजानन सलगर यांना गाठले. परंतु दरम्यानच्या काळात हा सर्व लवाजमा मिरजेला पोहचेपर्यंत मिरज येथिल पोलीसांची मोठी कुमक छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कोणी हलवू नये यासाठी सज्ज झाली होती.
यामध्ये तीन डी.वाय.एस.पी. तीन चार पोलीस निरीक्षक व दोनशे पोलीसांचा फौजफाटा तैनात होता.सुरूवातीला पोलीसानी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती जतला नेण्याला पूर्णपणेविरोध दर्शविला होता. परंतु जतचे माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. विलासराव जगताप यानी मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर व पोलीस प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भा.ज.प.चे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, संग्राम जगताप,आण्णा भिसे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, रणधिर कदम, संतोष मोटे, नगरसेवक प्रकाश माने, दिपक चव्हाण, अजिंक्य सावंत, अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
जगताप म्हणाले,आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसाठी मूर्तीकार श्री. गजानन सलगर यांना सोळा लाख रूपये दिले आहेत.
त्यापूर्वी त्यांच्याशी लेखी करार केला आहे. कराराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती तयार झाली आहे. आणी ती नेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमची मूर्ती आमच्या ताब्यात द्यावी व विषय संपवा असे सांगितले.त्यावर समिती व प्रशासन पोलिस यांच्यात झालेल्या चर्चेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत अखेर पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीला काही अटीवर मूर्ती ताब्यात दिली. याप्रसंगी सांगली चे खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्र्वारूढ मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. व छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यामध्ये जिल्हाधिकारी श्री. अभिजित चौधरी यांच्याशी जत येथे मूर्ती बसविण्यासाठी सर्वानी सविस्तर चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्याचे ठरले. तसेच जो पर्यंत जिल्हाधिकारी हे यासंदर्भात निर्णय देत नाहीत तो पर्यंत ही मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चबुत-यावर बसवू नये असेही सांगण्यात आले.यासर्व अटी मान्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा क्रेनच्या सहाय्याने आयशर मध्ये ठेवून तो जतकडे नागजमार्गे आणण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जतचे पोलीस उपनिरिक्षक श्री.महेश मोहीते यानी मिरज ते जत येथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच रॅलीच्या पुढे व पाठीमागे पोलीस व्हॅन लावल्या होत्या. अशा प्रकारे पोलीस बंदोबस्तात ही छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती रात्रीच्या वेळी माजी आ.विलासराव जगताप यांच्या पेट्रोलपंप परिसरात आणण्यात आली.
यावेळी शिवप्रेमीनी मोठी गर्दी केली होती. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी व फटाक्यांच्या जोरदार अतिषबाजीने हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतली बैठक
जत शहरातील हा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्या संदर्भात विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांनीही नुकतीच बैठक घेतली.यात पुतळा बसविण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे,अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे करण्याचे ठरले होते.त्यानुसार त्यांनी तशी मागणी डॉ.चौधरी यांच्याकडे केली होती.
जतेत मुर्ती पाहण्यासाठी गर्दी
जत शहरात आणण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोलपंपावर मोकळ्या जागेत ठेवण्यात आले आहे.ट्रकमध्ये मुर्ती ठेवण्यात आली आहे. माजी आमदार जगताप यांनी जतमध्ये मुर्तीची पुजा केली.आरतीही करण्यात आली आहे. मुर्ती पाहण्यासाठी शहरातील शिवप्रेमी गर्दी करत आहेत.