जत,संकेत टाइम्स : जत शहरात बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसलाच पाहिजे आणि बसवणारच,शिवरायांच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आणि या पुढेही करणारही नाही,विरोधकांंनी राजकारण बंद करावे,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पत्रकार बैठकीत केले.
आमदार सांवत म्हणाले,छत्रपती शिवराय
हे महाराष्ट्राचा आभिमान आहेत, त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. छत्रपती शिवराय हे मराठी माणसाचा स्वाभिमान आहेत. पण महाराजांच्या पुतळ्याच्या श्रेयवादासाठी जतेत जे घाणेरडे राजकारण केले जात आहे ते चुकीचे आहे.प्रशासनाला सोबत घेऊन आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून जत शहरांमध्ये लवकरच पुतळा बसविणार आहोत.
आमदार सावंत म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून माजी आमदार विलासराव जगताप हे राजकीय पुर्नवसन करण्याचा प्रयत्न करत आहेत.राजकीय श्रेयवादासाठी त्यांच्याकडून मला बदनाम केले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती स्थापनेसाठी आमचा विरोध कधीच नव्हता.गेल्या पंधरा दिवसात आम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.शासनाने २०१७ साली काढलेल्या परिपत्रकानुसार परवानग्या काढण्याची गरज होती.मात्र गेल्या सात वर्षात समितीच्या अध्यक्षांनी परवानगी काढली नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती येताच त्यांनी हट्ट सुरू केला आहे.
आम्ही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुतळा बसविण्यास परवानगी द्यावी,आम्ही परवानग्यांसाठी सर्व प्रकारे मदत करू,असेही सांगितले आहे.यावेळी खा.संजयकाका पाटील हेही उपस्थित होते.असे असतानाही माझ्याविषयी उलटसुलट प्रचार करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनता सुज्ञ आहे,त्यांना सर्व कळते आहे.तालुक्याच्या प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे,असेही आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले.