स्वास्थ्य कार्ड आणि आरोग्य सुविधा

0
1
पाश्चिमात्य आणि विकसित देशांमधील रुगांना डॉक्टरांकडे जाताना कोणताही कागद,चाचण्यांचे अहवाल घेऊन जावे लागत नाही. तुम्ही त्यांचे रुग्ण असाल तर सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध असते. तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला जायचे असेल तर तुम्ही त्यांना फक्त रुग्ण क्रमांक सांगायचा. तुमचा आरोग्याचा सर्व डाटा त्यांच्या लॅपटॉप स्क्रीनवर उपलब्ध होतो. मागील औषधोपचार पाहून ते तुम्हाला चांगल्याप्रकारे सल्ला देतील. पुन्हा पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या करायला सांगणार नाहीत.फक्त आवश्यक असेल तरच पुन्हा चाचण्या घ्यायला सांगितले जाते. विकसित देशांमधील बहुतांश डॉक्टरांनी आपले स्वतःचे ऍप विकसित केले आहे.त्याद्वारे रुग्णांनी आपल्या समस्या डॉक्टरांना सांगितले जाते आणि त्यांना डॉक्टर ऑनलाईन सल्लाही देतात.

 

त्यामुळे तिथल्या लोकांचा आणि डॉक्टरांचाही वेळ चांगलाच वाचतो आणि आरोग्याची समस्याही तातडीने सुटते. आपल्यात देशातल्या केंद्र आणि राज्य सरकारांनी  सरकारी रुग्णालयांच्या मदतीने आता या सुविधा आपल्या देशातही राबवायला हव्या आहेत.खासगी डॉक्टरांनीदेखील आपला आणि रुग्णांचा बहुमोल वेळ वाचवण्यासाठी आणि रुग्णांना योग्य, अचूक सल्ला आणि औषधोपचार मिळण्यासाठी यासाठी पुढाकार घ्यायला हवा आहे. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या काही भागासाठी डिजिटल स्वास्थ्य कार्ड योजना सुरू केली आहे.

 

या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकांचे डिजिटल स्वास्थ्य कार्ड तयार झाल्यास सर्वच दृष्टीने आरोग्याचे सुलभीकरण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सरकारने गती घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार, पुडूचेरी, दादरा नगर हवेली, दीव दमण, लक्षद्वीप लडाख आणि चंदीगड मिळून एक लाख डिजिटल स्वास्थ्य कार्ड तयार करण्यात आली. आता संपूर्ण देशात ही योजना राबवली जात आहे. आधार कार्डावर जशी आपली माहिती उपलब्ध आहे, तशीच स्वास्थ्य विषयक माहिती स्वास्थ कार्डावर असणार आहे. त्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जाताना जुनी कागदपत्रे घेऊन जावे लागणार नाही. माहिती डिजिटल स्वरूपात सर्व्हरवर उपलब्ध असणाऱ्या आहे.फक्त कार्डाचा नंबर टाकला की सगळी माहिती क्षणार्धात डॉक्टरांच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीन उपलब्ध होईल.

 

या उपक्रमातून देशातील सर्व डॉक्टर्स ,इस्पितळे आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणारे आयुष्यमान भारतच्या केंद्रीय सर्व्हरशी जोडले जातील. आपण एकाद्या डॉक्टरला आपली प्रकृती दाखवली तर संबंधित कागद आपोआप त्यांच्या क्लिनिकमधून आपल्या स्वास्थ्य कार्डावर जाईल. घरबसल्या चांगल्या डॉक्टरांकडून सल्ला मिळवता येईल. आणिबाणीच्या आणि महत्त्वाच्या वेळी या कार्डाचा उपयोग ‘अल्लादिनच्या दिव्या’ सारखा होणार आहे. गंभीर अपघातानंतर एखाद्याला त्वरित दवाखान्यात दाखल केले जाते. तेव्हा त्याचा रक्तगट लगेच कळत नाही. त्यासाठी चाचणी करावी लागते. यात वेळ जातो.

 

तसेच एखाद्याला हृदयरोग, मधुमेह किंवा औषधांची ऍलर्जी असते. अशा रुग्णांबाबत त्वरेने काही माहीत मिळत नाही. संबधीत माहिती मिळवण्यासाठी वेळ जातो. जर अपघातग्रस्त नागरिकाजवळ स्वास्थ कार्ड असल्यास त्वरित उपचार करायला मदत होते. काहींचे प्राण वाचू शकतात.

 

स्वास्थ्य कार्ड नागरिकांच्या फार उपयोगाचे आहे,हे मान्य केले तरी सर्वात महत्त्वाची गरज आपल्या देशात ज्याची आहे,ते म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची! ही व्यवस्था पांगळी आहे. त्यामुळे देशातल्या खुर्द,बुद्रुक गावांमध्ये सर्वसामान्यांना उपचारच वेळेत मिळत नाहीत. आपल्याकडे डॉक्टर असतात तर औषधे नसतात आणि कुठे कुठे दोन्हीही गोष्टी उपलब्ध नसतात.त्यामुळे रुग्णांना मोठ्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन औषधोपचार करून घ्यावा लागतो. अर्थात वेळ आणि पैसा याला कात्री बसतेच. देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा अगदी अल्पदरात उपलब्ध व्हायला हवी हा मुद्दा असला तरी तो जवळपास मिळायला हवा.
यासाठी देशातील आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालये सर्व सोयीनीयुक्त असलायला हवीत. आणि देशातील आरोग्य व्यवस्थेवरील निधीमध्ये भरीव वाढ जोपर्यंत होत नाही, खर्चाची जबाबदारी असलेल्या प्रत्येकाचे उत्तरदायित्व निश्चित केले जात नाही,तोपर्यंत सध्याच्या परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. भ्रष्टाचार हा आणखी एक मुद्दा आहेच. यासाठीही कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हायला हवी.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here