भरकटलेला युवा वर्ग       

0
3

 

‘देशातील युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून या युवा वर्गात प्रचंड ऊर्जा आहे या ऊर्जेचा उपयोग देशकार्यासाठी केला तर आपला देश जागतिक महासत्ता बनेल’ हे उदगार होते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा युवावर्गावर प्रचंड विश्वास होता. युवा वर्गच देशाला जागतिक महासत्ता बनवेल असा त्यांना विश्वास होता आज मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या युवा वर्गाच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत तोच युवा वर्ग आज भरकटत चालला आहे. मागील काही महिन्यात घडलेल्या घटना पाहता युवा वर्ग चुकीच्या मार्गावर चालला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

 

देशाचे भविष्य शाळा कॉलेजच्या चार भिंतीच्या आत तयार होते. मात्र याला कुठेतरी गालबोट लागताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी शाळा, कॉलेजमध्ये शिस्तीचे धडे गिरवत विद्यार्जन करावे ही अपेक्षा असते. विद्यार्थ्यांनी शाळा, कॉलेजमध्ये उत्तम गुण मिळवत तसेच विविध कलागुण दाखवून चर्चेत यावे, प्रसिद्ध व्हावे अशी अपेक्षा पालकांची असते मात्र सध्याचे विद्यार्थी शाळाबाह्य कारणासाठी चर्चेत येताना दिसत आहेत. कर्नाटकात एका कॉलेजमध्ये प्राचार्यांनी विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो मुले मुली रस्त्यावर उतरले.

 

त्यांना विरोध करण्यासाठी शेकडो विद्यार्थी गळ्यात भगवे उपरणे घालून रस्त्यावर उतरले. केवळ कर्नाटकातच नाही तर देशभर हेच चित्र पाहायला मिळत होते. शाळा असो की कॉलेज जो गणवेश ठरवून दिला आहे तोच गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान केला पाहिजे   मात्र कॉलेजची शिस्त न पाळता आम्हाला वाटेल तेच कपडे घालू त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ही  विद्यार्थ्यांची भावना देशाला अराजकतेकडे घेऊन जाणारी आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बरं हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून केले तर सोशल मिडियावर शिवराळ भाषेत  व्हिडीओ करणाऱ्या हिंदुस्तानी भाऊ नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून. कोणीतरी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आव्हान करतो आणि त्याला बळी पडून तरुण मुले रस्त्यांवर उतरतात हे सर्व अजब आहे. दहावी बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.

 

या परीक्षा ऑफलाईनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय नसेल वेळ वाढवता येऊ शकते. तशी मागणी विद्यार्थी परीक्षा मंडळाकडे किंवा सरकारकडे करू शकतात मात्र आम्ही सांगू तशाच परीक्षा झाल्या पाहिजेत  ही विद्यार्थ्यांची मागणी चुकीची असून तिचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. बुली बाई एप नावाचे एप बनवून त्यावर समाजातील प्रतिष्टीत महिलांची बदनामी केल्याप्रकरणी मागील महिन्यात १८ ते २१ वयोगटातील युवकांना पोलिसांनी अटक केली तर थेरगावची डॉन म्हणून सोशल मीडियावर हिंसक व्हिडिओ बनवणाऱ्या तरुण मुलीला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जेरबंद केली.

 

या सर्व घटना पाहता देशातील युवा वर्ग भरकटत चालला आहे असेच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांमधील ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वापरली जात आहे. काही समाज कंटक विद्यार्थ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने विद्यार्थीही त्यांना बळी पडत आहे,.  युवकांच्या उर्जेचा उपयोग देश कार्यासाठी होण्याऐवजी देश विघातक कार्यासाठी होत आहे. हे थांबायला हवे. तारुण्याची सुरवात अशी करणे हे आपल्या हिताचे नाही हे या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. कोणत्याही देशाचे भविष्य हे देशातील तरुणांच्या हातात असते. विचारांनी प्रगल्भ आणि उत्साहाने परिपूर्ण असे हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते.

 

मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाने झालेला शिक्षणाचा खेळखंडोबा, ऑनलाइन शिक्षणामुळे हाती आलेला स्मार्टफोन यामुळे युवा वर्ग भरकटला आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याऐवजी चुकीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा  प्रयत्न काही  समाज कंटक करत आहेत. विद्यार्थी जर चुकीच्या मार्गावर गेला तर देशही चुकीच्या मार्गावर जाईल त्यामुळे समाजातील धुरीणांनी याचा गांभीर्याने विचार करून भरकटलेल्या युवा वर्गास योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्ह्यातील पुणे

९९२२५४६२९५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here