भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरू असून या मालिकेचा दुसरा आणि शेवटचा डे नाईट कसोटी सामना बंगळुरू येथे सुरू असून हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत तो सामना आणि मालिका भारताने जिंकली असेल कारण भारताला विजयासाठी ९ बळींची गरज होती. या मालिकेत भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर उत्तम कामगीरी केली असून कर्णधार रोहित शर्मानेही संघाचे उत्तम नेतृत्व केले आहे. चंदीगड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली.
त्याने १७५ धावा काढत माजी कर्णधार कपिल देवचा रेकॉर्ड मोडला तसेच त्याने दोन्ही डावात मिळून नऊ बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे तो आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंचा यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाला. त्याला श्रेयश अय्यरनेही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी तर संपूर्ण मालिकेत भेदक गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांच्यापुढे श्रीलंकन फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याने तर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात पाच बळी घेतले विशेष म्हणजे ही खेळपट्टी मंदगती गोलंदाजांना ( स्पिनर्स ) साथ देणारी होती. फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाने पाच बळी घेणे ही विशेष कामगिरी आहे.
चारही डावात श्रीलंकन फलंदाजी ढेपाळली त्यांना एकदाही दोनशेचा आकडा पार करता आला नाही. भारतीय गोलंदाजांप्रमाणेच फलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी संयम राखत फलंदाजी केली. श्रेयश अय्यरने पहिल्या डावात भारताचा डाव सावरत एक अविस्मरणीय खेळी केली. त्याला शतक करता आले नसले तरी त्याच्या खेळीचे मोल शतकापेक्षा कमी नव्हते. दुसऱ्या डावतही त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याला ऋषभ पंत आणि कर्णधार रोहित शर्माने छान साथ दिली. रोहित शर्माने दोन्ही डावात छोट्या पण महत्वाच्या खेळी केल्या.
ऋषभ पंतने तर कमाल केली. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले मात्र दुसऱ्या डावात त्याने ती कसर भरून काढली. त्याने अवघ्या २८ चेंडूत ५० धावा काढून विक्रम केला. हा विक्रम ४० वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नावावर होता. हा विक्रम मोडीत काढत त्याने इतिहास रचला. भारताकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम आता ऋषभ पंत याच्या नावे झाला आहे. त्याने २८ चेंडूत अर्धशतक झळकवताना ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १७० पेक्षाही अधिक होता.
परिस्थिती कशीही असो आपला नैसर्गिक खेळ सोडायचा नाही ही ऋषभची वृत्ती सर्वांना आवडली. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असे म्हटले जाते ऋषभने तेच केले. त्याच्या या कामगिरीची सर्वत्र वाहवा होत आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही कुशल नेतृत्व करून आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निवड समितीचा निर्णय किती योग्य होता हे दाखवून दिले आहे. एकूणच भारतीय संघाने सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगीरी करून श्रीलंकेला चारीमुंड्या चित केले आहे. टी २० पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताने श्रीलंकेला व्हाईट वाश दिला आहे. ही भारतीय क्रिकेट अभिमानाची बाब आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५