जत : राष्ट्रीय संत गाडगेबाबा, बागडेबाबा यांनी सर्वसामान्यांची जनसेवा केली, जनजागृती केली. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांनी त्यांच्या भजन, किर्तनातून जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगितले पण आजही ही गोष्ट आपल्या डोक्यात बसली नाही हे दुर्देव. माणसातील देव ओळखा, गरजवंतांना मदत करा, जनसेवेसे व्रत हाती घ्या असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चिखलगी भुयार मठ येथे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम बीज साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे तुकाराम बीज साधेपणाने साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने भाविकांनी भुयार मठात तुकाराम बीज निमित्त मोठी गर्दी केली. दोन दिवस चाललेल्या तुकाराम बीज सोहळ्यात विविध कीर्तनकारांची कीर्तने रंगली. विविध धार्मिक सोहळा पार पडला. तुकाराम बीज निमित्य आयोजन रक्तदान शिबिरात अनेक भाविकांनी रक्तदान केले.
काल्याच्या किर्तनाने तुकाराम बीज सोहळयाची सांगता झाली. यावेळी मंगळवेढा येथील खरेदी- विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे , भैरवनाथ शुगरचे चेअरमन सावंत, पंचायत समितीचे सदस्य नितीन पाटील, सरपंच दिनेश पाटील, पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ ,वास्तू शास्त्रज्ञ सरिता लिंगायत, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे रामचंद्र रणशिंगे, बाबासाहेब विटेकर, पप्पा शेख, बजरंग ताड, शिवाजी फटे आदी उपस्थित होते.
काल्याच्या किर्तनात तुकाराम बाबा महाराज यांनी मोबाइल युगात नेमके कसे उलटे सुरू आहे, माणूस माणसापासून कसा दूर जात आहे दाखल्यासह सांगत मायबापांनो वेड्यावणी नका वागू अन्यथा भविष्यात सारे चित्र उलटे दिसेल असे सांगितले.
एकत्र कुटुंब पद्धती गेली, विभक्त कुटूंब पध्दतीतही जिव्हाळा राहिलेला नाही. मोबाइलच्या या युगात माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही, आपलेपणा संपत आला आहे. मोबाइल हा सर्वाचा जीव की प्राण झाला आहे. मोबाइलच्या या मोहजाळ्यातून बाहेर पडा हे सांगण्याची दुर्देवी वेळ आली आहे. लहान मुलांना, तरुणांना अध्यात्म व एकमेकांना मदत करण्याची शिकवणच आता लुप्त झाली आहे. भजन, किर्तन जरूर ऐका बसुन त्याचबरोबर समाजात जे गरजवंत आहेत त्यांना मदत नव्हे कर्तव्य म्हणत मदत करा, गोरगरिबांचे अश्रू पुसा, समाजकार्यात स्वतःला झोकून द्या असे आवाहन तुकाराम बाबा यांनी यावेळी केले.
■ तुकाराम बाबांनी जपला वारसा…
तुकाराम बीज निमित्य मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोना, महापूर, दुष्काळ, अध्यात्म क्षेत्र व केलेल्या सामाजिक कार्याचा उहापोह करणारी एका १२ पानी सचित्र विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय संत गाडगेबाबा, बागडेबाबा यांनी जो सामाजिक कार्याचा पाया रचला, त्याच पायावर तुकाराम बाबा महाराज यांनी समाजकार्य करत आपली मांडणी केली असून तुकाराम बाबा यांनी राष्ट्रीय संत गाडगेबाबा, बागडेबाबा यांच्या विचारांचा वारसा जपल्याची प्रतिक्रिया मान्यवर व भक्तांनी यावेळी आवर्जून व्यक्त केली.