जत,संकेत टाइम्स : जत शहरातील विठ्ठलनगर परिसरात बेकायदेशीर सावकारी करून दहशत माजवणाऱ्या सावकारी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 20 कोरे स्टॅंप, वेगवेगळ्या बॅंकेचे 78 चेक, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी कारसह अनेक मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही जत तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष उर्फे लखन पवार याच्याविरोधात सावकारी तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. एका फिर्यादीच्या तक्रारीवरून जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर जत पोलिसांनी रात्री अचानक आरोपी लखन पवार याच्या घरावर छापा टाकला. मात्र, पोलीस येण्याची खबर लागताच आरोपीने घरातून धूम ठोकली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरातून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे असलेले 20 कोरे स्टँप, वेगवेगळ्या बँकेचे 78 चेक, 5 खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी आणि चारचाकी कार, ट्रँक्टरचे आरसी बुक, टीटी फाँर्म, 2 हिशोबाच्या वह्या तसेच आरोपीचे वेगवेगळ्या बँकेचे पासबुक, एक कँलक्युलेटर, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई ही जत शहरातील सावकारी विरोधात सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी लखन पवार याच्याविरोधात सावकारी अधिनियम तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फरार असलेला आरोपी लखन पवार याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.