तासगाव,संकेत टाइम्स : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील दिनकरआबा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाढीव शाखा मागणीच्या प्रस्तावाला सहकार आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या संस्थेचा आता विस्तार होणार आहे. तासगाव शहरासह सावळज याठिकाणी वाढीव शाखा होणार आहेत, अशी माहिती संस्थापक सुखदेव पाटील यांनी दिली.
वायफळेसारख्या ग्रामीण व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावात दूरदृष्टी ठेवून सुखदेव पाटील यांनी 1992 मध्ये पतसंस्था सुरू केली. या संस्थेला माजी आमदार स्व. दिनकरआबा पाटील यांचे नाव दिले. हल्लीची सहकाराची अवस्था बघितल्यास ग्रामीण भागात सहकारी संस्था काढणे, चालवणे व या संस्था टिकवणे, हे वाटते तितके साधे, सोपे व सरळ काम नाही. मात्र तरीही सुखदेव पाटील यांनी वादळात दिवा लावून पतसंस्था सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले. अतिशय कष्टाळू व प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ दिली. जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर ही संस्था नावारूपाला आणली.
शून्यातून सुरू केलेली ही संस्था आज जिल्ह्यात नावारूपाला आली आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे संस्थेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या या संस्थेचे 700 सभासद आहेत. तर सुमारे 200 कोटींची उलाढाल आहे. तर दीड कोटी रुपये फायद्यात आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्यात येतो. याशिवाय भेटवस्तूही देण्यात येतात.
या संस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला आहे. या कष्टाळू व होतकरू तरुणांची कुटुंबे उभी करण्याचे काम सुखदेव पाटील यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांनाही तन, मन अर्पून प्रामाणिकपणे काम केले आहे. स्वतः सुखदेव पाटील यांचे एमकॉम पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यामुळे त्यांना संस्था चालवण्याची तांत्रिक माहिती आहे. संस्थेच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्यांचे लक्ष असते. सातत्याने ते कर्मचारी व संचालकांना मार्गदर्शन करत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेली ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी पाटील यांनी रात्रीचा दिवस करून तन, मन, धन अर्पून काम केले आहे. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. आता हा वटवृक्ष आणखी मोठा करण्याचा पाटील यांचा मनोदय आहे.
त्यासाठी सावळज व तासगाव या दोन ठिकाणी या संस्थेच्या वाढीव शाखा काढण्यासाठी सहकार आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. कालच या मागणीला परवानगी मिळाली. त्यामुळे आता सावळज व तासगाव येथे लवकरच दोन्ही शाखांचा शुभारंभ घेणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.