जत,संकेत टाइम्स : बेकायदेशीर गुटखा वाहतूक करताना दोघांना सापळा रचून जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील अॅक्टीव्हा गाडीसह साठ हजार किंमतीची सुगंधी सुपारी व गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
राजेंद्र बाळासाहेब कापसे (वय ४२,संभाजी चौक, जत) विजय रघुनाथ शेलार (वय २६, रा.देवनाळ, ता. जत) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जत येथे कर्नाटकातून गुटखा व बंदी असलेली सुगंधी सुपारी आणत असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार जत पोलिसांनी सोमवारी दुपारी सापळा रचला होता. खोजनवाडी येथे जत पोलिसांचे पथक थांबले असता एक्टिव्हा गाडीवरुन वेगाने दोघेजण संशयितरित्या जाताना दिसले. या दोघांनाही हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न करत केला असता त्यांनी गाडी थांबवली नाही.
गाडीचा पाठलाग करून दोघांनाही पकडले असता पोत्यामध्ये उग्र वासाची तंबाखू व गुटखा असल्याचे दिसून आले. या दोघांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.