खुनाचा प्रयत्न करून अठरा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
पुणे : खुनाचा प्रयत्न करून अठरा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा, सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून अतिशय सिताफिने जेरबंद केले. अटक केलेला आरोपी उदय जितेंद्र लोखंडे (वय २२) हा रा.केशवनगर मुंढवा येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २१ मध्ये रहीम शेख (वय २४ रा. सदानंद नगर मंगळवार पेठ) याच्यावर सहा जणांनी धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील १८ महिन्यांपासून फरार असणारा आरोपी हा केशवनगर येथील शिंदे वस्ती येथे आपल्या आई-वडीलांना भेटायला येणार आहे. माहिती मिळताच सदरील माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांना कळविण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक हेमचंद्र खोपडे व तपास पथकातील हेमंत पेरणे, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी, रहीम शेख, प्रमोद जगताप, जितेंद्र पवार, गणेश वायकर, दत्तात्रेय भोसले, लखन शेटे हे खासगी वाहनाने केशवनगर येथे पोचले. त्यांनी परिसरात सापळा रचून लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल असून, एका वर्षासाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार देखील करण्यात आले आहे.
सदरील कामगिरी पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त, राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 9 पुणे शहराच्या श्रीमती प्रियंका नारनवरे, फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण जाधव, पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, सुभाष पिंगळे, रहिम शेख, श्याम सूर्यवंशी, प्रमोद जगताप, जितेंद्र पवार, गणेश वायकर, दत्तात्रय भोसले, लखन शेटे मपोअं, प्रिया गंगावणे आदींनी केली आहे.