रसिकांना भरभरून देणारे गायक: मोहम्मद रफी

0
4

महम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच्या घराण्यात गायकीचा कुठलाच इतिहास नव्हता,पण मोहम्मद रफी यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. गावात येणाऱ्या फकिराची गाणीही ते गात. संगीत दिग्दर्शक श्यामसुंदर यांनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. याला कारण घडलंही तसंच होतं.

एकदा प्रसिद्ध गायक अर्थात हे गायक नंतरच्या पिढीतल्या बहुतांश गायकांचे गुरू ठरले,ते के.एल. सैगल यांचा गायनाचा कार्यक्रम रफी यांच्या गावाजवळच्या गावात ठरला होता. गायनाचे वेड लागलेल्या रफी यांनी त्यांचा भाऊ हमीदसह तिथे पोहचले. पण वीज गेल्यानं सैगल गाऊ शकले नाहीत. पण हमीदने वीज येईपर्यंत मोहम्मदला गायनाची संधी द्यावी, अशी विनंती आयोजकांकडे केली. मोहम्मद रफी यांनी माईकशिवाय आपल्या खणखणीत आवाजात गाणी म्हटली. प्रेक्षक खूश झाले. इथे श्यामसुंदरही उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या गाण्याची प्रशंसा केली. आणि पुढे गायनाची संधीही दिली.

 

1944 साली पहिल्यांदा रफी यांनी ‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटात गाणे गायले.याच वर्षी ‘गाव की गोरी’ या हिंदी चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. ‘अनमोल घडी’ (1946) या चित्रपटापासून रफी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांना मागे वळून पाहवंच लागलं नाही.
शम्मी कपूरचा धसमुसलेपणा, देव आनंदच खोडकरपणा, दिलीप कुमार यांचा रोमॅंटिक अंदाज, धर्मेंद्रचा रांगडेपणा, राजेंद्र कुमारचा लव्हरबॉय आणि भारातभूषण यांचा साधेपणा त्यांच्या आवाजात उतरायचा. त्यामुळे या सगळ्या नायकांना रफीचा आवाज आपलाच आवाज आहे, असे वाटायचे. गाण्यांची निवड करताना मोहम्मद रफी गाण्याचा नायक कोण आहे, हे आवर्जून विचारायचे.

 

‘बाबूल की दुवाएं लेती जा’ (नीलकमल) या 1968 मध्ये आलेल्या गाण्याने यशोशिखर गाठले. आजही हे गाणे लग्न समारंभात (प्रत्यक्षात किंवा सिनेमा-मालिकांमध्ये) वाजवले जाते. विशेष म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर दोन दिवसांतच त्यांच्या मुलीचा ‘निकाह’ होता आणि त्यांची ही कन्या लाडकी होती. मुलीच्या लग्नात त्यांच्या भावनांचा बंध फुटला नसला तरी या गाण्यात मात्र तो प्रकर्षांने जाणवतो. यावेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

 

मोहम्मद रफी म्हणजे देवमाणूस होता, हे अनेकांनी अनुभवलं आहे. एके ठिकाणी त्यांच्याबाबत चित्रपट-लेखक इसाक मुजावर यांनी लिहिलं आहे- एकदा एक भिकारी रस्त्याकडे बसून गात होता. पण जाणाऱ्या-येणाऱयांचे त्याच्याकडे लक्षच जात नव्हते. खरे तर तो भिकारी खूप जीव तोडून गात होता. शेवटी मोहम्मद रफी त्याच्या बाजूला बसले आणि गाऊ लागले. मग काय!त्यावेळी तब्बल 400 रुपये गोळा झाले. लोकांनीही या माणसाला ओळखलं (पडद्यामागचा कलाकार असल्यानं) नाही. जाताना रफी यांनी आपली शालदेखील पांघरली.

 

मोहम्मद रफी यांनी जवळपास सर्वच संगीतकारांकडे गाणी गायली. मात्र नौशाद यांचा रफीवर अधिक लोभ होता. अर्थात सगळ्यांनाच मोहम्मद रफी यांच्याविषयी स्नेह होता. म्हणूनच रफी यांनी चतुरस्त्र गाणी गाऊ शकले. शम्मी कपूर यांच्यासाठी ‘चाहे कोई मुझे जंगली कहे…’ आणि भारत भूषण यांच्यासाठी ‘मन तरपत हरी दर्शन को’ गाणारे रफी वेगवेगळे आहेत का, असा प्रश्न पडतो. रफी यांनी मराठी चित्रपटातदेखील काही गाणी गायली आहेत.

 

 

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here