लम्पी आजाराचे तालुक्यात मोफत लसीकरण : आमदार सुमनताई पाटील 

0
4
कवठेमहांकाळ : एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे आलेले पूर,झालेले पिकांचे नुकसान तर दुसरीकडे जनावरांवर ओढवलेल्या लम्पी आजारामुळे जगाच्या पोशिंद्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे.लम्पी आजाराचा देशात तसेच राज्यात कहर सुरू असून जवळपास ८२,००० जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये आणि पशुधन सुरक्षित रहावे,या हेतूने कवठे महांकाळ तालुक्यात जनावरांना मोफत लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आमदार सुमनताई पाटील यांनी केले आहे.

 

          अग्रणी रुबर्न डेव्हलपमेंट फाउंडेशन व आर.आर.पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना मोफत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा संसाराचा गाडा सुरळीत हाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पशुधनावर ओढवलेल्या या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.या संकटाचा सामना करत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मतदारसंघातील पशुधन वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी दिली आहे.

 

              पशुधन वाचवण्यासाठी पशूवैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना जनावरे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.नागरिकांनी देखील गावातील जनावरांना असणारा धोका ओळखून लम्पीचा प्रसार होणार नाही यासाठी दक्ष राहावे असेही आमदार सुमनताई पाटील यांनी घाटनांद्रे येथे जनावरांच्या लसीकरणावेळी सांगितले.

 

                    सशक्त पशू,सशक्त शेतकरी,सशक्त तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ ही संकल्पना घेऊन युवानेते रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यावर ओढवलेल्या या संकटाचा शर्थीने मुकाबला करू,अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते अमर शिंदे यांनी दिली.याप्रसंगी परिसरातील शेतकरी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here