जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कर्नाटक सीमा भागातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी भेटून कृतिशील विश्वास द्यावा, अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून जत तालुक्याला पाणी देण्यासाठी, तसेच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी तालुका विकासाच्या बाबतीत मागास राहिला आहे. जनता हक्काच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, पण कोणत्याच शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या विरोधात मोठा रोष आहे. प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांनी जतच्या जनतेला कृतिशील विश्वास देण्याची गरज असल्याचे विक्रम ढोणे म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केला. त्यामुळे सीमा भागातील गावांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जत तालुक्यातील कर्नाटक सीमा भागातील काही गावे कर्नाटकात जाण्याची भाषा करु लागली आहेत. याला वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्नच कारणीभूत आहेत. तालुक्याचा पाणीप्रश्न, तसेच तालुका विभाजनाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी उदासीनता दाखविल्याने ही परिस्थिती ओढवली आहे,असेही ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सर्वच राज्यकर्त्यांकडून फसवणूकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारीत म्हैसाळ योजनेला तत्वतः मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी २०१९ च्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान संखच्या सभेत दिली होती.आता योजनेचे टेंडर काढून प्रत्यक्षात कामास सुरूवात करण्याची गरज आहे.अन्यथा सिमाभागातील नागरिकांचा आक्रोश अटळ आहे,असेही ढोणे म्हणाले.