खानापूर : खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल, 16 काडतुसे असा 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. प्रभाकर तुकाराम जाधव (वय ५३ वर्षे रा.घोटी (बु), ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी बेकायदा अग्निशस्त्रे घेऊन फिणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे निरीक्षक डोके यांनी एक पथक तयार केले होते. घोटी येथे संशयित जाधव पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती निरीक्षक डोके यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने एस. टी.स्टँड चौक येथील सार्वजनिक कटयाजवळ एकजण उभा असलेला दिसला. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह व त्याचे पॅन्टचे खिशामध्ये १६ जीवंत राऊंड व एक मॅगझीन सापडले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्याच्याकडील पिस्तुल,काडतुसे जप्त करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. तेली, अतिरिक्त अधिक्षक श्रीमती दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक जे. ए. जाधव, तुकाराम नागराळे, रवींद्र धादवड, प्रदिप पाटील,महावीर कांबळे, शिवाजी हुबाले पोना, संतोष, सुहास खुबीकर, महेश खिलारी, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विटा : जप्त करण्यात आले पिस्तुल व आरोपी तसेच सोबत तपास करणारे पोलीस अधिकारी