जनमित्र – महावितरणचे सैनिक

0
2

 

|| नाना कामे नाना लोके, या विजेच्या उद्योगात ||

|| घर, शेती, उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक सेवांसाठी .. ||

|| ठेविती अखंडित विजेसाठी ध्यान ||

|| ऊन वारा पावसाचे-राखती ना भान ||

|| राबती रात्र न दिन – लावूनी तन-मन ||

|| करिती कसरत तारेवरची क्षणोक्षण ||

|| आपल्या सेवेतून प्रकाशती जन-जन ||

|| म्हणोनि ते प्रकाशदूत, ग्वाही देई हे मन||

या ओळीतून महाराष्ट्र प्रकाशमान ठेवणाऱ्या वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा उचित गौरव केला आहे.

 

रात्रीच्या प्रवासाच्या वेळी डोंगरमाथ्यावरून बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिल्यास दुरदुरपर्यंत लुकलुकणारे मिणमिणणारे विजेचे दिवे दिसू लागतात. या लुकलुकणा-यां दिव्यांचा गुच्छ, शांतपणे पहुडलेल्या गावांची ओळख देत असतो. शांत, सुरक्षित, रात्रीच्या गर्भात निवांतपणे उद्याची स्वप्न उराशी कवटाळून हजारों माणसें विश्रांती घेत असतात. घरातील प्रत्येकजण काळोखास भेदणारे प्रकाशाचे सुरक्षाकवच पांघरूण विश्रांती घेऊ शकतो. कारण वीजक्षेत्रातील हजारों माणसांचे हात ते कवच अभेद्य ठेवण्यासाठी झटत असतात. डोळ्यात तेल घालून घरातील, गावातील दिवे प्रकाशमान रहावे, यासाठी जनमित्र राबत असतो. सर्वत्र पसरलेला वीजेचा लखलखाट ही त्याच्या परिश्रमाची किमया असते. जनमित्र म्हणजे वीजपुरवठा या मुलभूत सेवाक्षेत्रात अहोरात्र परिश्रम घेणारे महावितरणचे सैनिक होय.

 

महावितरणच्या भाषेत जनमित्र, सामान्यांच्या नजरेत वीजक्षेत्रात स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी ‘लाईनमन’ वा ‘वायरमन’ या नावाने लोकप्रिय असतात. खाकी वेशात / वर्दीत गावात कर्तव्य बजावणारा हा सेवाव्रती माणूस लोकांच्या दृष्टीने त्यांचा एक मित्र, लोकसेवक असतो. कार्यक्षेत्रातील वीज खांब, वीजवाहिन्या, रोहित्रे या विद्युत जाळयाचा / प्रणालीचा मित्र, रक्षक, प्रशासक, विश्वस्त असतो. प्रशासकीय पातळीवर विद्युत सहाय्यक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ असा लाईनमन पदाबाबत चढता पदानुक्रम असतो. लाईनमनच्या ताफ्यात टेस्टर, पक्कड (इन्सुलेटेड प्लायर), पेचकस (स्क्रू ड्रायवर), रबरी हातमोजे (हॅन्डग्लोज), गमबुट, डिस्चार्ज रॉड (आर्थिंग रॉड), झुला, मेगर (वीजवाहिनीत नेमका दोष ठिकाण शोधण्यासाठी वापराचे उपकरण) या अत्यावश्यक सुरक्षा साधनांचा समावेश असतो. या साधनांच्या मदतीने कार्यक्षेत्रात वीजेची कामे करताना तो एका शुर सैनिकासारखा दिसतो.

 

ग्रामीण भागात गावातील जेष्ठांपासून बालगोपाळापर्यंत लाईनमन ओळखीचा माणूस असतो. तसा तो शहरातही नगरातील रहिवाशांनाही ओळखीचा असतो. सर्वसामान्य माणसांपासून, शिक्षक, युवा नेतृत्व ते लोकप्रतिनिधींच्या मोबाईलच्या संपर्क यादीत तो असतो. गावातील दुकानात, चहाच्या टपरीवर, कधी डिपीवर वा अन्य ठिकाणी त्याचं नाव व मोबाईल नंबर कधी कोळशाने तर कधी खडूने कोरलेला, लिहलेला असतो. त्याला गावातील प्रत्येक कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण ठरलेलं असतं. मुंजीपासून तेराव्यांपर्यंत सगळ्या कार्यक्रमात त्याची हजेरी असते. गावात मिसळून जाउन काम करणा-या या लाईनमनला गावातील वीजपुरवठा, ग्राहक संबंधासह कार्यालयीन कामे व जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. कधी दुरूस्तीसाठी वीजखांबावरचं काम, कधी डीपीचं (वितरण रोहित्र) काम, नवीन वीजजोडणीचे कामे, वाकलेले पोल तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरूस्ती, प्रसंगी मीटर रीडींग, वीज बीलांच वाटप, वीजबील वसुली, वीजचोरी रोखणे अशी वेगवेगळी कामे दिवसरात्र जागरूक राहून तो करीत असतो. गावात लाईन बंद झाली काही वेळातचं लाईनमनच्या फोनची रिंग अखंड सुरू असते. प्रत्येकाचे फोन घेत अखंडीत वीजपुरवठा देण्याची जबाबदारी त्याला पार पाडायची असते. त्यासाठी वरिष्ठ अभियंते, सहकारी यांच्याशी सातत्याने बोलावे लागते. त्यामुळे कधी -कधी त्याच्या फोनची रिंग वाजूनही फोन उचलला जात नाही मग काय प्रसंगी शिव्यांची लाखोळी वाहिली जाते. परंतु एकदा गावात खाकी वर्दीतील लाईनमन दिसला की लोकांना वीजपुरवठा सुरू होण्याची पुर्ण खात्री असते. लोकांच्या सेवेसाठी तोही स्वतःला बांधील समजतो. दुरूस्तीसाठी वीजेच्या १५ मीटरच्या खांबावर भरभर चढण्यांच त्याच्या अंगी असणारं कसब अफलातून असते. कधी कधी वीजखांबावर काम करताना हा लाईनमन फोन उचलून (जे धोकादायक आहे) सांगत असतो, झालं… काम सुरू आहे, पाच दहा मिनिटात येउनच जाईल लाईन… तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तो बिघाड दुरूस्त करून लवकर वीजपुरवठा सुरू व्हावा, याकरीता लाईनमन चोखपणे आपलं काम करीत असतो. कमी-अधिक वेळेत वीजपुरवठा पुर्ववत होतो. त्याकरीता नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य केल्यास त्याला फोनवरील संभाषणातील वेळ कामासाठी देता येईल. सुरळित वीजसेवेसाठी वेळेत वीज बील भरून, वीजचोरी थांबवण्यास सहकार्य करून सुजाण ग्राहक लाईनमनच्या कामात हातभार लावू शकतात. गेल्या वर्षभरापासून लाईनमनची माहिती

 

 

 

तंत्रज्ञानाशी मैत्री अधिक प्रमाणात वाढली आहे. महावितरणच्या सर्व सेवा ग्राहकांच्या बोटावर मिळाव्यात, याकरीता महावितरणने ग्राहकांसाठी व कर्मचा-यांसाठी मोबाईल अॅप तयार केले आहे. महावितरण कर्मचारी मोबाईल अॅप वापराव्दारे तो अॅपवरच रिडींग घेणे, नवीन वीज जोडणीची माहिती, वीज बंद कालावधीची माहिती भरतो आहे.

 

महावितरणचा हा कर्मचारी कायम सामाजिक जाणीवेने आपली जबाबदारी पार पाडीत असतो. त्याला चांगलं ठाऊक असतं की, वीजेच्या दिव्याखाली देशाचं भवितव्य असलेले विद्यार्थी अभ्यास करित आहेत, लाखोंचा पोशिंदा शेतकरी शेतात उभ्या पिकाला पंपानं पाणी देतोय, उद्योजक आपल्या कारखान्यात उत्पादन करतोय. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास याचा परिणाम या सगळयांवर होणार. तेंव्हा वीजसेवा सुरळित ठेवण्यासाठी तो कायम दक्ष राहून इतरांना उजेड वा वीज मिळावी म्हणून अंधारातही सैनिकांच काम अविरतपणे करीत असतो. एक आदर्श लाईनमन हा सुरक्षा साधनांचा वापर करून स्वतःच्या जीवाची सुरक्षा बाळगतो. आपल्या जबाबदा-या व्यवस्थितपणे पार पाडताना कंपनीचे हीत जोपासून ग्राहकांना सेवा देण्याचे कार्य करीत असतो. महावितरणमध्ये राज्यभरात साधारणतः ८० हजारहुन अधिक तांत्रिक- अतांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील महावितरणचा प्रतिनिधी, वीजसेवेचा डोलारा सांभाळणारा वीज वितरण यंत्रणेतील अंतिम व महत्वपुर्ण घटक, घराघरातील वीजेचे दिवे उजळत ठेवण्याचे कार्य करणारा माणूस म्हणजे जनमित्र, तोच महावितरणचा सैनिक आहे.

 

अनेक नामांकित खेळाडू, कवी, कलाकार…

महावितरण कर्मचारी जनमित्रात अर्थात लाईनमनमध्ये अनेक खेळाडू, कलाकर, चित्रकार, लेखक, कवी दडलेले आहेत. सांगली शहर विभागात कार्यरत नरेश सावंत हे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता आहे. कोल्हापूर शहर विभागातील सुदर्शना ढाले या कवी व लेखिका आहेत. त्यांचे ‘तो एक सुर्य’, ‘गंध ओल्या मातीचा’ हे दोन कवितासंग्रह, ‘गोल गोल भाकरी’ हा कथासंग्रह, ‘प्रारब्ध’ ही कादंबरी तर भोवरा ही लघुकथा प्रकाशित आहे. मंगेश कांबळे हा हरहुन्नरी कलाकर नाट्यरंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवू पाहतोय. त्याने ‘कबीर’, ‘पिएल का एसआरके’, ‘एक होता बांबु काका’ अशा अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका वठविल्या आहेत. सध्या अनेक स्पर्धात राज्यात क्रमांक पटकविणाऱ्या ‘बॅलन्स शीट’ नाटकात ते भुमिका साकारत आहेत. राहूल कांबळे या शरीरसौष्ठवपटूंने विविध स्पर्धातून राष्ट्रीय पातळीवरील कितांबावर आपले नाव कोरले आहे.  ते ‘महाराष्ट्र श्री’, ‘मिस्टर इंडिया’ पुरस्कार प्राप्त आहेत. स्थानिक स्पर्धामध्ये त्यांनी अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

 

 

किशोर खोबरे

जनसंपर्क अधिकारी 

महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

7875769026

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here