आलिबाग : अलिबागमधिल नथुराम पवार खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.पैशाच्या वादातून दोन जवळच्याच नातेवाईकांनीच पवार यांचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे,असे पोलीसाकडून सांगण्यात आले.
युनियन बँक ऑफ इंडीया अलिबाग शाखेत शिपाई पदावर काम करणाऱ्या नथुराम रुपसिंग पवार याची निघृण हत्या करण्यात आली होती. अलिबाग तालुक्यातील सहाण पाले बायपास येथे त्याचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात होता.घटनेनंतर पोलीस तपास सुरु होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसाकडून कसोशीने तपास सुरू केला होता.नथुराम पवार यांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांकडे पोलीसाकडून चौकशी सुरू होती.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातूनही शोध सुरू होता. तपासा दरम्यान नथुराम पवार याचे नातेवाईक असलेले निलेश पवार आणि साहिल राठोड हे दोघे त्याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. मात्र पोलीस तपासाचा सुगावा लागताच हे दोघे फशार झाले होते. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला होता. दोघांच्या शोध घेण्यासाठी पथके,पुणे सोलापूर, कर्नाटक येथे पाठविण्यात आली होती. त्यातील निलेश पवार यास पोलिसांनी सोलापूर येथून ताब्यात घेतले तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.मयत नथुराम याने निलेश याच्याकडून युनियन बँकेत नोकरी लावतो असे सांगून एक लाख रुपये घेतले होते. बँकेत साफसफाईचे कामही तो करून घेत होता पण नोकरीला लावले नाही.या रागातूनच नथुरामाची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पुढील तपास पोलीसाकडून सुरू आहे. दरम्यान निलेश पवार यास न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सुनील फड, आणि अनिकेत म्हात्रे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.