कुपवाड उता-याला नावे लावणेसाठी तलाठी व भावी उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद इंगोले ( वय 38, रा.विजयनगर कुपवाड रस्ता, कृष्णकुंज अपार्टमेंट, फ्लॅट नं 104 सांगली) याला दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.इंगोले याची उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. काही दिवसांनी खाकी अंगावर चढून दोन स्टार झळकणार होते. खाकीचे फोटोसेशनही केले होते. तत्पूर्वी तो लाचखोरीत अडकला.
अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचा मित्र निखील आठवले याचे आजोबा गुलाब सुदाम गाडे यांनी सन 1992 मध्ये गुंठेवारीमधील अजिंक्यनगर कुपवाड येथील घरजागा गट नंबर ३३१/४ खरेदी पत्र करुन घेतलेली आहे. जागेचे महानगरपालिकेचे गुंठेवारी प्रमाणपत्र घेतलेले आहे. परंतु जागेच्या सात बारा उता-याला नावे लावलेली नसल्याने उता-याला नावे लावणेसाठी कुपवाड तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. नोंद जुनी असल्याने सातबारावर नोंद घालण्यासाठी तलाठी सचिन इंगोले यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 27 रोजी तक्रार दिली.
लाचलुचपत पडताळणीमध्ये तक्रारदाराच्या मित्राचे काम करण्यासाठी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.आज लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने तलाठी कार्यालय कुपवाड येथे इंगोले विरूध्द सापळा लावला असता तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये स्विकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले. इंगोलेविरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.उपाधिक्षक संदिप पाटील,निरिक्षक विनायक भिलारे,दत्तात्रय पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.