तासगाव : तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरचे प्राचार्य विजय पाटील व उपप्राचार्य चंद्रकांत होरे यांनी पोषण आहाराचा चेक काढण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या लाचेचा 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारलाही आहे. तर लाचेच्या उर्वरित रकमेसाठी पोषण आहाराचा चेक तब्बल दीड महिन्यांपासून अडवून ठेवला आहे. हा सगळा प्रकार साप्ताहिक ‘जनतांडव’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेरात कैद झाला आहे.
याबाबत माहिती अशी : तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार पुरवला जातो. तासगाव येथील रेणुका महिला बचत गटाकडे गेल्या दहापेक्षा जास्त वर्षांपासून हा पोषण आहार पुरवण्याचा ठेका आहे. पोषण आहाराचे स्वतंत्र खाते बँकेत काढण्यात आले आहे. शासनाकडून या खात्यावर ठेकेदाराचे बिल जमा केले जातात. त्यानंतर प्राचार्य व शाळा व्यवस्थापन समिती या बिलाचा चेक रेणुका महिला बचत गटाच्या नावाने काढते.
मात्र हा चेक देताना बचत गटाला महाविद्यालय प्रशासनाकडून प्रत्येकवेळी त्रास दिला जातो. वारंवार लाचेची मागणी केली जाते. विद्यमान प्राचार्य विजय पाटील व उपप्राचार्य चंद्रकांत होरे यांनी वर्षभराचे चेक काढण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच ठरवून घेतली आहे. या शैक्षणिक वर्षातील पोषण आहाराचे चेक काढताना पहिल्या टप्प्यात 50 हजार रुपयांची लाच या जोडगोळीने घेतलीही आहे. मात्र उर्वरित लाचेची रक्कम देण्यास ठेकेदाराने थोडीशी टाळाटाळ केल्याने त्यांच्या बिलाचा चेक अडवून ठेवण्यात आला आहे.
या ठेकेदाराचे मागील सुमारे 1 लाख 55 हजार रुपयांचे बिल 30 मार्च 2023 रोजी जमा झाले आहे. हे बिल जमा होऊन तब्बल दीड महिना झाला तरी अद्याप ठेकेदाराच्या नावाने चेक काढण्यात आला नाही. संबंधित ठेकेदाराने या चेकसाठी अनेकवेळा महाविद्यालयाचे उंबरे झिजवले आहेत. मात्र तरीही चेक देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
याबाबत संबंधित ठेकेदाराने साप्ताहिक ‘जनतांडव’कडे तक्रार केली होती. ‘जनतांडव’ने याबाबत शहानिशा करण्यासाठी महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी संबंधित ठेकेदाराचे पैसे दीड महिन्यांपूर्वीच खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्राचार्य विजय पाटील व उपप्राचार्य चंद्रकांत होरे यांना विचारणा केली असता या दोघांनीही ठेकेदाराने ठरलेली लाचेची रक्कम दिली नसल्याचे निर्लज्जपणे सांगितले. लाचेच्या उर्वरित दीड लाखांची तडजोड 1 लाख 15 हजार रुपयांमध्ये करण्यात आली आहे. हे पैसे आणून द्या आणि चेक घेऊन जा, असे पाटील आणि होरे लाज सोडून सांगत होते.
हा सगळा प्रकार साप्ताहिक ‘जनतांडव’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेरात कैद झाला आहे. जिथं ज्ञानदानासारखे पवित्र काम केले जाते, त्याठिकाणी अशी लाचखोरी चालत असल्याने शैक्षणिक क्षेत्रही बरबटले असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये पगार असणारे प्राचार्य, उपप्राचार्य लाचखोरीला चटावले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या लाचखोर प्राचार्य व उपप्राचार्यांवर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.