जिल्ह्यात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिले. मार्चपर्यंत जाणवणारी थंडी फेब्रुवारीतच गायब झाली होती. तर फेब्रुवारीच्या अखेरीसच सातारा शहराचा पारा ३७ अंशापर्यंत पोहोचलेला. त्यामुळे यंदा उन्हाळा असह्य करणारी अशी स्थिती होती. मागील दोन महिन्याचा विचार करता शहराचा पारा कायम ३० अंशावर आहे. एकदाच कमाल तापमान ३९ अंशापर्यंत गेले होते.
त्यानंतर वळवाचा पाऊस झाल्याने पारा ३२ अंशापर्यंत खाली आला होता.मात्र, चार दिवसांपासून पारा सतत वाढत चालला आहे.जत शहरात मागील आठवड्यात पाऊस झाला. त्यावेळी पारा खालावला होता. मात्र, काही दिवसांतच तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी तापमान ३३.७ अंश नोंद झाले.जतकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. तसेच दुपारच्या सुमारास उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे टाळले.
दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा वाढू लागलाय. शुक्रवारी ३३.६ अंशावर तापमान होते. यामुळे महाबळेश्वरचा पाराही ३५ अंशाकडे झुकू लागल्याचे दिसून आले.
पूर्व भागात सूर्य कोपला…
जतच्या पूर्व भागात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्यामुळे तेथे उन्हाच्या झळा असह्य होतात. सध्या या दुष्काळी भागातील पाऱ्याने ३८ अंशाचा टप्पा केव्हाच पार केला आहे. सूर्य कोपत असलातरी बळीराजा आणि मजुरांना काम करावेच लागत असल्याचे दिसत आहे.