सांगली : सांगलीतील विविध भागात चोऱ्या करणाऱ्या सोलापूरातील सराईत चोऱ्यास पोलीसांना पकडत त्याच्याकडून विश्रामबाग पोलिसांनी २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.बाबू काजाप्पा मुंगली (वय २७, रा.शांतीनगर, मजरेवाडी, सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ६ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
सांगली शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांच्या वतीने विशेष पथकाकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.पथकाला शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली,पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याची झडती घेतली असता, त्यात स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, एक्सा ब्लेड, हातोडा आढळून आला.पोलीसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगलीत चोरी केल्याची कबुली दिली.
त्याने संजयनगर व विश्रामबाग परिसरात ६ घरफोड्यांचे गुन्हे तपासात निष्पन्न झाले.संशयित चोरट्याकडून सोन्या-चांदीची दागिने व इतर असे दोन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस निरीक्षक संजय मोरे, परिविक्षाधीन उपअधीक्षक मनिषा कदम, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, आदिनाथ माने, महंमद मुलाणी, दरीबा बंडगर यांनी हि कारवाई केली.