हिंदू नववर्षाचा पहिला सण गुढीपाडवा नुकताच पार पडला. इंग्रजांनी भारतातील अनेक प्रांतांवर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले. इंग्रज मायदेशी परतून आज ७६ वर्षाहून अधिक काळ लोटला मात्र इंग्रजांच्या संस्कृतीचा प्रभाव आजही आपल्या वागण्या बोलण्यात आणि आचरणात दिसत आहे. स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचा निभाव लागावा यासाठी आज बहुतांश पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालत आहेत परिणामी या पिढीच्या वर्तणुकीत इंग्रजी भाषेचा आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.
गुढीपाड्व्यावर सुद्धा हा प्रभाव दिसून आला. हिंदू दिनमानानुसार दिवसाची सुरुवात पहाटे सूर्योदयापासून होते, त्यामुळे कोणत्याही शुभदिवसाची मग तो दिवस वाढदिवसाचा असो वा सण-उत्सवाचा त्याच्या शुभेच्छा सूर्योदयानंतर दिल्या जायला हव्यात; मात्र यंदाही गुढीपाडव्याचे शुभेच्छा संदेश आदल्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून येऊ लागले. काही महाभागांनी तर कामाच्या व्यापात शुभेच्छा द्यायच्या राहून जाऊ नयेत म्हणून आदल्या दिवशीच शुभेच्छांचा सोपस्कार आटोपला. या शुभेच्छांवर सुद्धा इंग्रजीचा प्रभाव होताच. ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छां’ऐवजी ‘हॅपी गुढीपाडवा’चेच संदेश अधिक येत होते. हॅपी आणि शुभ यांतील फरक आजच्या पिढीला कोण सांगणार ? ३१ डिसेंबरला इंग्रजी नववर्षाचे स्वागत रात्री १२ वाजता फटाके फोडून केले जाते तसे काही महाभागांनी गुढीपाडव्याचे स्वागतही रात्री १२ वाजता फटाके फोडून केले.
हिंदू नववर्षाचे स्वागत दारोदारी रांगोळ्या काढून, उंबरठ्यापाशी गुढी उभारून, पारंपारिक वेष परिधान करून केले जाते. आधुनिक पिढीवर असलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे नववर्षाच्या स्वागताची पद्धतच आज पालटली आहे. फाल्गुन अमावास्येच्या मध्यरात्री क्रूरकर्मा औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली होती. त्यांच्या देहाचे तुकडे केले होते. समस्त हिंदूंसाठी ती काळरात्र होती. अशा मध्यरात्रीच्या प्रहरी फटाके वाजवून जल्लोष करणे योग्य नाही हे या पिढीला कोण सांगणार ? काळ बदलला तशा चालीरीती बदलल्या, सण साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या. सण साजरा करताना त्यामध्ये आधुनिकता आणणे चुकीचे नाही मात्र या आधुनिकतेमुळे समाजात चुकीचा संदेश जात असेल, सणांमागील पावित्र्य भंग पावत असेल तर ते थांबवायला हवे !