जत : तालुक्यातील मूळ म्हैसाळ योजनेतून वेळेवर पाणी देणे, विस्तारित म्हैसाळ योजना पूर्णत्वासाठी प्रयत्न सुरू आहे, तालुक्यात नव्याने लागणारे ५३३ ट्रान्सफॉर्मर निरंतर योजनेतून मंजूर करणे, विस्तारित योजनेसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपये निधीच्या कामाची तरतूद करणे, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारी पाणी प्रश्न व प्रशासकीय इमारत हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, रस्त्याचा दर्जा सुधारणे यासह आजवर तालुक्याच्या विकासाचा असलेला बॅकलॉग भरून काढणार असल्याची माहिती आ. गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिमेंट कार्पोरेशन दिल्लीचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामद, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, संजय तेली, भाऊसाहेब दुधाळ उपस्थित होते.
आ. पडळकर म्हणाले, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी ताकदीने हे २०२३-२४ मध्ये अपेक्षित असलेले काम पूर्ण केले आहे. आणखी पाचशे कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा केली आहे. त्यावर त्यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून निरंतर योजना, जिल्हा नियोजनसह इतर योजनेतून जत येथे ५३३ रोहित्र, आटपाडी ३८० व खानापूर २९० यासाठी ८४ कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. तालुक्यात नवीन सब स्टेशन मागणी आहे. त्यासाठी पवनचक्कीचे तीन सवस्टेशन आहेत. ते शासनाने ताब्यात घेऊन तिथे सब स्टेशन सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जतच्या त्रिभाजनाचा प्रश्न मांडला होता. त्यांनी दांगट समितीसमोर हा प्रस्ताव मांडून त्यानंतर विभाजनाला मंजुरी देण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असल्याचे सांगितले होते. यासाठी लवकरच दांगट समितीची भेट घेऊन जतच्या त्रिभाजनाचा विषय मांडणार आहे, असे आ. पडळकर यांनी सांगितले.
अतिक्रमण केलेल्या २५० कुटुंबांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा वन विभागाकडून दिल्या आहेत. मात्र, वन हक्क समिती कायद्यांतर्गत ही घरे अधिकृत करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या लोकांना राहत्या घरातून बाहेर जावे लागणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.