अध्यात्म हे सुद्धा एका प्रगत आणि प्रगल्भ शास्त्र आहे हे ओळखून डॉ. आठवले यांनी प्रवचने, व्याख्याने, सत्संग, अभ्यासवर्ग यांतून अध्यात्म वैज्ञानिक पण सहज आणि सुलभ भाषेत सांगायला सुरुवात केली. अध्यात्मातील सिद्धांत आगळ्या पद्धतीने उलगडल्यामुळे अनेक डॉक्टर, अभियंते, वकील, शास्त्रज्ञ, पत्रकार यांसारखा सुशिक्षित वर्गही त्यावेळी डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांना उपस्थित राहू लागला. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असून अध्यात्मात तात्विक ज्ञानाला २ टक्के तर प्रत्यक्ष कृतीला ९८ टक्के महत्व आहे आणि ही कृती म्हणजेच साधना. डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांना येणारा जिज्ञासू वर्ग नामजपादी साधना करू लागला. साधना केल्यावर अनुभूती येतात आणि अनुभूतींमुळे श्रद्धा वाढते आणि त्यातूनच भावनिर्मिती होऊन चराचरात भगवंताचा वास जाणवू लागतो. हा प्रवास शब्दात मांडणे सोपे असले, तरी कृतीमध्ये आणणे तितकेच अवघड आहे; मात्र ज्याने या प्रवासातील अडथळे पार करून साधनेतील विविध टप्पे ओलांडले त्याने अध्यात्मातील अद्वितीय आनंद चाखला आहे. डॉ. आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना करून आज अनेक साधक अध्यात्मातील आनंद अनुभवत आहेत. स्वतःतील दोष नाहीसे कारण्यासाठी आणि गुणांचे संवर्धन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. अहंनिर्मूलनासाठी सतर्कतेने प्रयत्न करत आहेत. जेव्हढे प्रयत्न अधिक तेव्हढा आनंदही अधिक याची अनुभूती सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारा प्रत्येक साधक आज घेत आहे. आपल्याला मिळणारा साधनेतील आनंद इतरांनाही मिळावा यासाठी सनातनचे अनेक साधक गावोगावी जाऊन अध्यात्माचा प्रसार करत आहेत, लोकांना साधना सांगत आहेत. दिव्याने दिवा पेटवून जसा सारा परिसर तेजोमय करता येतो तसे आपल्याला उमजलेली साधना इतरांना सांगून सनातनचे साधक समाजात अध्यात्माचा प्रकाश पसरवून अज्ञानाचा अंधकार दूर करत आहेत. डॉ. आठवले यांनी सनातन संस्थारुपी लावलेल्या बीजातून आज कल्पवृक्ष साकारला गेला आहे. या कल्पवृक्षाच्या फांद्या आज जगभर विखुरल्या आहेत. संपूर्ण भारतासह विदेशातही सनातनचे साधक डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना करून स्वतःचा अध्यात्मिक उद्धार करून घेत आहेत. दिवसागणिक समाजाच्या ढासळत्या नीतिमत्तेचे परिणाम आज सर्वत्र दिसत आहेत.
खून, बलात्कार, विनयभंग, अपहरण, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. ३ वर्षाच्या बालिकेपासून ८० वर्षाची वृद्धाही वासनांधांच्या अत्याचारांना बळी पडत आहे. भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनू लागला आहे. पोलीस, ,शिक्षक, नातेवाईक यांच्यापासूनही स्त्रीया सुरक्षित राहिलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या हाती आलेले स्मार्ट फोन्स आणि इंटरनेट यांचा उपयोग कमी आणि दुरुपयोग अधिक होऊ लागला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजात नैतिक मूल्ये रुजवण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे महत्कार्य डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेचे साधक करत आहेत. अन्य पंथीयांना त्यांच्या प्रार्थना स्थळांतून त्यांच्या पंथाविषयी धार्मिक शिक्षण मिळते. देशातील बहुसंख्य हिंदू समाजासाठी मात्र दुर्दैवाने अशी कोणतीच व्यवस्था आज नाही. अशा परिस्थितीत हिंदू संस्कृतीतील आचारधर्म , सण उत्सवांमागील धर्मशास्त्र आणि ते कसे साजरे करावेत याबाबतची माहिती, हिंदू देवी-देवतांविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती, हिंदू धर्मातील प्रथा परंपरांमागील शास्त्र, प्राचीन ऋषी मुनींनी अखिल मानवजातीसाठी दिलेले महत्वपूर्ण योगदान, देवतांचे अवतारकार्य, देवतांच्या उपासनांमागील शास्त्र, आदर्श आणि आरोग्यदायी दिनचर्या, ऋतुचर्या, इत्यादी अर्थपूर्ण माहिती सनातन संस्थेच्या सत्संगांतून आणि धर्मशिक्षण वर्गांतून सांगितली जाते. याबाबतचे सविस्तर ज्ञानभांडार संस्थेच्या संकेतस्थळाच्या आणि युट्युब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर खुले केले आहे.
सनातन संस्थेच्या नियतकालिकांच्या रूपाने ते घरोघरी पोहोचवले जाते. देशात विविध ठिकाणी असणारे सनातन संस्थेचे आश्रम आदर्श जीवनशैलीचे दर्शन घडवणारी केंद्रे आहेत. सनातन संस्थेच्या साधकांसाठी ते साधनेला स्फूर्ती देणारे ऊर्जास्रोत आहेत. अध्यात्म इतके गहन आणि प्रगल्भ शास्त्र आहे कि त्यातील एकेका सूत्रावर अनेक खंड तयार व्हावेत. डॉ. आठवले यांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेल्या आशिर्वादानुसार त्यांनी आजमितीला ग्रंथलिखानाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. डॉ. आठवले यांनी संकलित केलेले अध्यात्मातील विविध अंगांची माहिती करून देणारे शेकडो ग्रंथ सनातन संस्थेने आजवर विविध भाषेत प्रकाशित केले आहेत. भावी पिढीला दिशादर्शन करणारे आणखी शेकडो ग्रंथ डॉ. आठवले संकलित करत असून येणाऱ्या काळात तेसुद्धा प्रकाशित होणार आहेत. भारतीय संस्कृतीच्या उद्धारासाठी अहोरात्र झटणारे आणि समाजाला अध्यात्मिक साधनेला लावून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा वसा घेतलेले अद्वितीय व्यक्तिमत्व डॉ. जयंत आठवले म्हणजे खऱ्या अर्थाने ‘भारताचा गौरव’ आहेत. डॉ. आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान असल्याचे मत डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सौ. बिंदा सिंगबाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०