बघतो – दाखवतोच्या भाषेला कोण घाबरणार : मतदारांनी का झिडकारले याचा विचार करणार आहात की नाही?
तासगाव : (अमोल पाटील) ; हा संजय पाटील कोण आहे हे जिल्ह्याला माहिती आहे. ज्यांनी – ज्यांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांचा व्याजासहित हिशोब चुकता करणार. माझं नशीब उलटं – सुलटं करणारा ‘माय का लाल’ अजून पैदा व्हायचा आहे, असली थिल्लर भाषा बोलायला आणि ऐकायला चांगली वाटते. मात्र अशा पोराटकी भाषेला आता कोणीच घाबरत नाही. राजकारणात कोणीच कोणाला कमी नसतात. इथे सगळेच टगे आहेत. त्यामुळे संजयकाका, तुम्ही आता नुसता हिशोबाच्या वह्या घालून एकेकाचे हिशोब चुकते करत बसणार आहात की आपलं गेल्या दहा वर्षात नेमकं काय चुकलं, मतदार – स्वतःच्या पक्षाचे लोक आपल्यापासून लांब का गेले, डोक्यावर घेणाऱ्यांनी आपणाला पायाखाली का घेतलं, याचं आत्मपरीक्षण करणार आहात, हा खरा प्रश्न आहे.
खासदार म्हणजे जिल्ह्याचा नेता असतो. ते एक जबाबदारीचं आणि महत्वाचं पद असते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच खासदार पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीला भाषा, सुसंस्कृतपणा आणि चालण्या – बोलण्याची रीत असावी लागते. दुर्दैवाने संजय पाटील ज्यावेळी सांगलीच्या राजकारणात होते त्यावेळी त्यांची जी भाषा बोलत होते, तीच भाषा एक वेळा विधानपरिषद आमदार व दोन वेळा खासदार झाल्यावरही तशीच आहे. मुळात राजकारणात एका ठराविक उंचीवर गेल्यावर परिपक्वता येणे अपेक्षित असते. मात्र उठसुठ पाप – पुण्य, नीती – अनीती, देव – धर्म मानणाऱ्या संजय पाटील यांना बोलण्या – चालण्याची परिपक्वता आलेली दिसून आली नाही.
2014 ला देशात मोदी लाट होती. ही लाट ओळखून संजय पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. भाजप प्रवेश केला. लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासोबत त्यांची लढत झाली. मोदी लाट व प्रतीक पाटील यांच्याविरोधातील नाराजी यामुळे संजय पाटील यांनी लोकसभेचे मैदान मारले. सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त केला. सांगलीला पहिल्यांदाच भाजपचा खासदार झाला.
एकीकडे संजय पाटील खासदार झाल्यानंतर जिल्ह्यात भाजपला सुगीचे दिवस आले होते. तर दुसरीकडे भाजपच्या जुन्या व एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना होती. मागील दाराने पक्षप्रवेश देऊन आयारामांना खासदार केल्याची कुरबुर होती. मात्र ही चर्चा फार काळ चालली नाही. संजय पाटील खासदार झाल्याने त्यांचा वारू चौफेर उधळला. तासगाव तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांना तर आकाश ठेंगणे झाले होते. तासगाव – चिंचणीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या जीवावर अनेक उद्योग – ‘धंदे’ सुरू केले. हळूहळू कार्यकर्ते गब्बर होऊ लागले. जसा थोडाफार पैसा जवळ येईल तशी कार्यकर्त्यांची भाषा बदलू लागली. अनेक कार्यकर्ते शिवराळ भाषेत बोलू लागले. सोशल मीडियावर हे कार्यकर्ते अनेकवेळा फणा काढताना दिसून आले.
संजय पाटील यांना 2014 मध्ये खासदार करण्यासाठी अनेकांनी घाम गाळला होता. पण दुर्दैवाने काळ पुढे सरकेल तसे संजय पाटील एकेकाला विसरू लागले. अनेकांना कोलून स्वतंत्र गट तयार करण्याचा प्रयत्न झाला. पक्षांतर्गत मंडळींशी पंगा घेत विरोधी पक्षातील नेत्यांच्या मांडीला मांडी लावत आपल्याच मंडळींचा ‘कार्यक्रम’ करण्याचा प्रयत्न झाला. परिणामी पक्षांतर्गत नाराजी वाढत गेली. त्यातच संजय पाटील यांच्याभोवती ठराविक कार्यकर्त्यांची टोळी तयार झाली. ही टोळी खासदारांना काहीही सुचू देत नव्हती. सारखं खासदारांच्या कानात लावालाव्या करण्यात ही टोळी धन्यता मानत होती. त्यातच खासदारांचे कान अतिशय हलके झाले होते. कोणी काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवला जायचा. त्यामुळे खासदारांच्या कानाभोवती गुलूगुलू करणाऱ्या चांडाळचौकडीच्या करामती दिवसेंदिवस वाढत गेल्या.
संजय पाटील यांनीही आपल्या भोवती कोंडाळे करणाऱ्या टोळीचे नेमके काय चालले आहे, त्यांचे उद्योग काय आहेत, त्यांचे ‘धंदे’ काय आहेत, हे कधीच बघितले नाही. परिणामी या टोळीच्या करामतीमुळे सामान्य लोक संजय पाटील यांच्यापासून लांब होत गेले. भाजपच्या गटातही धाकधूक वाढली होती. भापजचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही संजय पाटील यांनी उभा दावा ठाकला. या मंडळींमधील अंतर्गत कलह वाढत गेला. त्यामुळे संजय पाटील यांना दिवसेंदिवस विरोध वाढत होता. 2019 ला उमेदवार बदला, अशी मागणी जोर धरू लागली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची समजूत काढली. त्यामुळे संजय पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली.
2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पुन्हा भाजपच्या मंडळींनी अंतर्गत मतभेद विसरून संजय पाटील यांचे काम केले. त्यांच्या समोर विशाल पाटील यांचे आव्हान होते. त्यावेळी जागावाटप आणि काँग्रेसमधील नियोजनाचा अभाव यामुळे विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी घ्यावी लागली. पण या निवडणुकीत संजय पाटील यांच्यासमोर विशाल पाटील यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दादा घराण्याला पराभवाचा सामना करावा लागला.
सलग दुसऱ्यांदा खासदार झाल्याने संजय पाटील यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला होता. दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर तरी संजय पाटील पक्षाच्या सर्व मंडळींना एकत्रित घेऊन काम करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या स्वभावात बदल झाला नाही. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असायचे. शिवराळ भाषाही सुरूच राहिली. अंगावर आलेल्या प्रत्येकाला त्यांनी शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला. तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघात लोक आपलाच आमदार, आपलाच खासदार म्हणत होते. संजय पाटील व स्व. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबात सेटलमेंटचे राजकारण सुरू होते. मात्र कवठेमहांकाळ नगरपंचायतीची सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी खासदारांनी जे उद्योग केले त्यामुळे आमदार गट त्यांच्यापासून दुरावला. सेटलमेंटच्या राजकारणाला मूठमाती देऊन आमदार गटानेही फाटी आखून काम करण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, 2019 प्रमाणे 2024 च्या निवडणुकीतही संजय पाटील यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास प्रचंड विरोध झाला. विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी थेटपणे विरोध केला. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेकांनी पडद्यामागून विरोध केला. मात्र भाजपकडे विनिंग मेरिट असणारा दुसरा उमेदवार नव्हता. संजय पाटील यांचा जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क होता. 10 वर्षात केलेली विकासकामे या निवडणुकीत तारून नेतील, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना होता. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यात संजय पाटील यांना यश आले.
संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने भाजपमधीलच अनेकांच्या मनात खदखद होती. सुरुवातीपासूनच अनेकांनी उघडपणे तर काहींनी पडद्यामागून त्यांना विरोध करायला सुरुवात केली. दुसरीकडे विशाल पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली. परिणामी विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. समोर आपल्या ताकतीचा पैलवान नसल्याने संजय पाटील यांच्या अंगातील बळ वाढले. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत नाराजांना अजिबात हिंगलले नाही. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने यावेळी आपण चार लाखांच्या फरकाने निवडून येत हॅट्ट्रिक करू, असा अतिआत्मविश्वास पाटील यांना होता.
हा ओव्हर कॉन्फिडन्सच संजय पाटील यांच्या अंगलट आला. नेमकी मतदारसंघात हवा काय आहे. अंडर करंट काय आहे. वारं कुठं वाहत आहे, याचा अंदाज पाटील यांना आला नाही. किंबहुना त्यांच्या भोवती कोंडाळे करणाऱ्यांनी ग्राउंड लेव्हलला नेमकी काय परिस्थिती आहे, हे धडपणे पाटील यांच्या कानावर घातले नाही. उलट सगळीकडे चांगली परिस्थिती आहे. आपण हॅट्ट्रिक करणार. लाखांच्या फरकाने निवडून येणार. तुमचे यावेळी मंत्रिपद पक्के आहे, असे कान भरवण्यात आले. त्यामुळे संजय पाटील हवेत राहिले. त्यांच्या अहंकार वाढला.
यातूनच त्यांच्या तोंडून ‘अरे – तुरे’ची भाषा येऊ लागली. ‘तू मैदान सोडून पळू नकोस. यात्रा आली की जोर बैठका मारणार मी पैलवान नाही. मी वस्ताद आहे. एकवेळ तुझ्या भावाचा पराभव केला आहे. एक वेळ तुझा पराभव केला आहे. आता दुसऱ्यांदा तुझा पराभव करणार आहे, अशी अहंकाराची व एकेरीची भाषा त्यांच्याकडून येत गेली. कार्यकर्त्यांनाही असली भाषा ऐकताना मजा वाटायची. संजय पाटील यांच्या या थिल्लर स्टेटमेंट्सच्या रिल्स बनवून कार्यकर्ते सोशल मीडियावर धुरकाट उठवून द्यायचे. परिणामी संजय पाटील शेवटपर्यंत अंधारात राहिले. त्यांना वस्तुस्थितीचा अंदाज आलाच नाही.
दुसरीकडे विशाल पाटील यांनी अतिशय शांत व नियोजनबद्धरित्या प्रचार यंत्रणा राबवली. विलासराव जगताप व अजितराव घोरपडे यांनी उघडपणे विशाल पाटील यांना साथ दिली. तर संजय पाटील यांच्यापासून दुखावलेल्या भाजपच्या अनेक मंडळींनी पडद्यामागून विशाल पाटील यांचे काम केले. एकाही नाराजाची समजूत काढण्यात संजय पाटील यांनी ‘इंटरेस्ट’ दाखवला नाही. उलट विशाल पाटील यांनी संजय पाटील यांच्यापासून दुरावलेल्या नाराजांची मोट बांधली. अनेक बड्या नेत्यांसह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी विशाल पाटील यांना अंतर्गतरित्या साथ दिली.
अखेर निवडणुकीत संजय पाटील यांचा अपेक्षेप्रमाणे लाखाच्या फरकाने पराभव झाला. निकालाच्या अगोदर काही दिवस संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘या संजय पाटलाचे नशीब उलट – सुलट करणारा ‘माय का लाल’ अजून जन्माला यायचा आहे. ज्यांनी – ज्यांनी या निवडणुकीत माझ्या गळ्याला हात घातला, ज्यांनी – ज्यांनी चिमटे काढण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार, अशी गर्जना केली होती. मात्र निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने चवथाळून उठलेल्या कार्यकर्त्यांनी संजय पाटील यांच्या याच वक्तव्याच्या रिल्स केल्या. त्यांच्याकडूनही एकेकाचा हिशोब चुकता करू, अशी बदल्याची भावना असणारी स्टेटमेंट येऊ लागली. एकेकाला बघतो, एकेकाला सरळ करतो, असे म्हणत सोशल मीडियावर शिवराळ भाषा बोलली जाऊ लागली.
वास्तविक संजय पाटील यांनी हिशोबाच्या वह्या घालून एकेकाचे हिशोब व्याजासहित चुकते करण्यापेक्षा गेल्या दहा वर्षात आपलं नेमकं काय चुकलं, पक्षातील लोकं आपल्यावर नाराज का आहेत, ज्या मतदारांनी आपणाला डोक्यावर घेतले त्यांनी आपणाला पायाखाली का खेचले, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण जत मतदारसंघ सोडला तर इतर पाचही मतदारसंघात संजय पाटील पिछाडीवर आहेत. त्यांचे होम ग्राउंड असलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातही मतदारांनी त्यांना नाकारले आहे. त्यामुळे उगाच हिशोब चुकते करत फिरण्यापेक्षा थोडंस अंतर्मुख होऊन आपल्या काय – काय चुका झाल्या आहेत, यावर त्यांनी ‘फोकस’ करणे गरजेचे आहे.
कोणत्याही नेत्याने बेरजेचे राजकारण करणे गरजेचे असते. उगाच हिशोब चुकते करत बसून आणि अंगावर आलेल्या प्रत्येकाला शिंगावर घेऊन राजकारण होत नसते. समोर विधानसभा आहेत. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात संजय पाटील 9 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. मतदारांनी आपणाला का नाकारलं, याचा विचार करून झालेल्या चुका दुरुस्त करण्यात त्यांचं भलं होणार आहे. शिवाय सभोवताली सारखं मागे – पुढे करणारी, दिसेल तिथे कधी बापाच्या पाया पडली नसतील पण आपले पाय धरणारी मंडळी पाठीमागे नेमके काय करतात, याचा कानोसा घेणे गरजेचे आहे. यातील अनेक मंडळींनी संजय पाटील यांना बदनाम करून सोडले आहे.
गेल्या दहा वर्षात संजय पाटील यांनी खासदार नेमका कसा असतो, हे जनतेला दाखवून दिले. गावागावात त्यांचा जनसंपर्क होता. विविध महामार्ग, पाणी योजनांना गती देऊन त्यांनी जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय घालून देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे यावेळी त्यांचा विजय होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र निवडणुकीच्या काळात संजय पाटील यांच्याकडून अरेरावीची भाषा येत गेली. बदल्याची भावना वाढत गेली. थिल्लर कार्यकर्त्यांनीही अनेकांवर गुरगुरणे सुरू केले. संजय पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांची अरेरावीची भाषा जनतेला रुचली नाही. भाजपमधील वैचारिक मंडळींनाही संजय पाटील व त्यांच्या गटाकडून येणारी भाषा अजिबात आवडली नाही. त्याचाच परिपाक म्हणून निवडणुकीत संजय पाटील यांना विरोध वाढत गेला. अखेर त्यांचा लाखाच्या फरकाने पराभव झाला.
आता उगाच एकमेकांचे हिशोब चुकते करत बसण्यापेक्षा संजय पाटील यांनी स्वतःच्या गिर्हेबानमध्ये ढुंकून पाहून आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ते जर असाच हिशोब चुकता करत बसले तर येणारी विधानसभेची निवडणूकही त्यांच्या हातातून जाईल. ज्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले तेच लोक विधानसभेलाही पायाखाली घेतील, हे मात्र नक्की..