जत : जत येथील राजे रामराव महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागामधून ऑक्सिजन पार्कची तथा तुळसी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे.100 टक्के ऑक्सिजनची निर्माण करणारे तुळशी वृंदावन विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार करण्यात आले.धकाधकीच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यात माणसाला चांगले आरोग्य लाभणे कठीण झाले आहे. वृक्षांच्या कत्तली मुळे वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी राजे रामराव महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक अभिनव कल्पना राबवली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून शुद्ध व स्वच्छ प्राणवायू मिळावा यासाठी राजे रामराव महाविद्यालयात ऑक्सिजन पार्क तथा तुलसी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे.
यापूर्वीही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून नारळ बाग, आंबा वनराई बाग, औषधी वनस्पतींची बाग, बॉटनीकल गार्डन, वाळवंटी वनस्पती पार्क, बाबू बाग व चिंच, पिंपळ, वड, लिंब, करंजाड अशा 1500 भारतीय वृक्षाची लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. आज महाविद्यालयाचा पंचवीस एकराचा परिसर विविध वृक्ष-वेलींनी बहरला आहे. सदर उपक्रमात मा.प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विभागातील प्रा.अशोक तेली, प्रा.रविंद्र काळे तसेच इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
राजे रामराव महाविद्यालयात तुलसी वृंदावन तयार करताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी