जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविणारे सुप्रसिद्ध उद्योजक, मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, सांगली जिल्ह्याच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांचे आज सोमवारी हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.
जत तालुक्यातील अंकलगी हे छोट्यासे खेडेगाव. ही त्यांची जन्मभूमी. सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. श्रीकांत चिपलकट्टी हे त्यांचे वडील. अंकलगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कर्नाटक राज्यात पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण दरबार हायस्कूल विजापूर येथे तर रायचूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदविका घेतली.
सरकारी नोकरी हे कधीच त्यांचे ध्येय नव्हते. अनुभवासाठी एका खासगी कंपनीत नोकरीला सुरूवात केली. इलेक्ट्रीक क्षेत्रातील पुरेसा अनुभव घेऊन कुपवाड एमआयडीसी सांगली येथे १९९५ मध्ये मॅग्नेविन एनर्जी या कंपनीची स्थापना करण्यात आली. ही कंपनी संरक्षण, विद्युत मंडळ इत्यादींना लागणारे विविध प्रकारचे कॅपेसिटर तयार करतात. मॅग्नेविन एनर्जीचे कॅपेसिटर आज जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केले जातात. देशातील जवळजवळ सर्व राज्यांत पाठविले जातात.
विजयकुमार चिपलकट्टी हे मल्लिकार्जुन विद्यावर्धक संस्था, अंकलगीचे अध्यक्षही होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकलगी ते करजगी रस्ता स्वखर्चाने केला. तर ग्रामदेवतेचे मंदिर स्वखर्चाने उभारले. अंकलगी पाणी योजनेच्या मंजूरीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सांगली जिल्हा सहकार बोर्ड व रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. त्यांच्या अचानक जाण्याने जत तालुक्याचे सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.