जत कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान | भूमीपुत्र की पार्सल भाजपाअंतर्गत वाद ; कोन मिळवणार तिकिट? 

0
16
जत : लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वात शेवटचा आणि जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारलेल्या जतमध्ये यावेळी नवीन राजकीय समिकरणे उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी प्रश्‍नामुळे कायम चर्चेत राहिलेला हा मतदार संघ सध्या काँग्रेसकडे असला तरी गतवेळचा पराभव धुऊन पुन्हा भाजपकडे खेचण्याचे जिकीरीचे प्रयत्न यावेळी सुरू आहेत. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलिकडच्या काळात जतमध्ये जास्त लक्ष केंद्रित केल्याने भूमीपुत्र की पार्सल असा वाद येथे भाजपअंतर्गतच पाहण्यास मिळत आहे. तरूण नेतृत्व तमणगोंडा रविपाटील यांनी पडळकर यांना निवडणुकीपुर्वीच जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षांतर्गतच आव्हान दिले आहे. भाजप अंतर्गत उमेदवारीसाठीचा संघर्ष दिसत असला तरी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्यापुढेही कसोटीचा काळ सध्या दिसत आहे.
जत तालुका हा विकासाच्या बाबतीत आजअखेर दुर्लक्षित मतदार संघ म्हणून ओळखला जात असला तरी राजकीय पातळीवर सजगता कायम दिसून आली आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी आतापर्यंत या मतदार संघात किंगमेकरची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. या पराभवाला भाजपचे तत्कालिन खासदार संजयकाका पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांना यावेळी पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष त्याग करीत अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या निर्णयाचे अन्य मतदार संघावर भाजपच्या दृष्टीने प्रतिकूल परिणाम होउन भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, अन्य मतदार संघात मताधिक्य कमी असताना जतमध्ये मात्र भाजपला मताधिक्य मिळाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधियय लक्षात घेउन आमदार पडळकर यांनी सुरक्षित मतदार संघ म्हणून जतमध्ये विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. गावपातळीवर आमदार हवा आता नवा असा नारा देउन चाचपणी सुरू केली असली तरी त्यांना अगोदरपासून विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक तमणगोडा रविपाटील यांचे भाजपची उमेदवारी मिळविण्यापर्यंत आव्हान राहणार आहे. पडळकर यांचा मतदार संघ आटपाडी असताना जतमध्ये का असा सवाल माजी आमदार जगताप यांनी उपस्थित करून रवि पाटील यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला असल्याने पडळकर यांची मैदानापुर्वीच कोंडी झाली आहे.भाजपअंतर्गत असलेल्या गट-तटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here