तिरुवनंतपुरम : मल्याळम चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने सोमवारी एम. मुकेशसह चार नामांकित अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे अगोदरच न्या. हेमा समितीच्या अहवालातील आश्चर्यकारक आणि धक्कादायक सत्याला तोंड देणाऱ्या या चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे.
या अभिनेत्रीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माकपचे आमदार मुकेश यांच्यावर आरोप करताच काँग्रेस युवा मोर्चा आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोल्लममध्ये या अभिनेत्याच्या निवासस्थानावर मोर्चे काढले. मुकेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह या मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या या आरोपांवर मुकेश यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या अभिनेत्रीने मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अन्य तीन दिग्गजांविरुद्धही असेच आरोप केले आहेत.दरम्यान, या सर्व आरोपांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी अभिनेता मणियांपिल्ला राजू यांनी केली आहे.