अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला मुंडेंच्या बालेकिल्ल्यात जोरदार प्रतिसाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सध्या सुरू असलेली ‘जन सन्मान यात्रा’ आज बीड जिल्ह्यातील बीड आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात पोहोचली. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे हेही उपमुख्यमंत्र्यांसोबत होते. बीड आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदार असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. हे राज्य आपल्या महापुरूषांचा अनादर सहन करणार नाही. ” उपमुख्यमंत्र्यांनी फरार असलेल्या कंत्राटदाराचा शोध घेण्याचं आश्वासन दिले. “शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची पुनर्बांधणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (बहुउद्देशीय मैदान) येथे महिला आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधताना अजित पवार यांनी त्यांच्या सरकारने हाती घेतलेले लोकोपयोगी उपक्रम आणि प्रमुख योजनांच्या फायद्यांविषयी माहिती दिली. माझी लाडकी बहीण योजनेच्या एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता आधीच प्राप्त झाला आहे. ज्यांना माझी लाडकी बहिन योजनेचे ३ हजार रुपये लाभ मिळालेला नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. हे सांगताना, “नागपुरात एक कार्यक्रम आहे तेव्हा उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाईल” अशी माहिती दिली.
राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यावर्षी जूनमध्ये लोक केंद्रित अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात पवारांनी अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले, “५२ लाख कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरच्या किमतीएवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.” त्याच बरोबर, सरकार शेतकऱ्यांना ६% व्याजदराने कर्ज देत असून ते स्वावलंबी व्हावेत यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या कल्याणकारी योजना चालवण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नसल्याचा आरोप राज्यातील विरोधक करत आहेत. “या सर्व योजना राबवण्यासाठी लागणारा पैसा, संसाधनं, आर्थिक ताकद आपल्या राज्याकडे आहे.” या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना पवार म्हणाले, “महिलांवर होणारे गुन्हे अक्षम्य आहेत आणि आम्ही हे सुनिश्चित करू की गुन्हेगार आणि त्यांचे संरक्षण करणाऱ्या दोघांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतील.” महिलांना ई-एफआयआर दाखल करता यावी,यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी २२ ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या महाराष्ट्रवादी हेल्पलाइनला अडीच लाखांहून अधिक लोकांनी अडचणी सांगण्यासाठी संपर्क केला आहे. त्यापैकी १ लाख ६० हजार प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना, “आम्ही राबवत असलेल्या योजनांबद्दल कोणतीही माहिती किंवा चौकशीसाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन (९८६१७१७१७१) सुरू करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येतील” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
बीड हा मुंडे घराण्याचाही बालेकिल्ला आहे. अजित पवार यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण करत आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांच्या उन्नतीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांची जाणीव असल्याची भावना व्यक्त केली आहे. बीडमधील विकास उपक्रमांबद्दल बोलताना ते म्हणाले,आम्ही गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे, बीडमधील ६ मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आलो आहेत.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील नगर रोड येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात महिला व शेतकरी यांच्याशी त्यानंतर त्यांनी संवाद साधला. महिला आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्यात संवाद साधताना, “पुढील निवडणुकीत, आतापासून ५ वर्षांनी, संसदेवर निवडून आलेल्यांपैकी एक तृतीयांश महिला असतील” अजित पवार म्हणाले आहेत. धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर आणि भारताच्या राज्यघटनेवर विश्वास असल्याचं प्रतिपादन करतानाच, “आम्ही कोणत्याही जातीचे नाही; शेतकरी हीच आमची ओळख आहे” असं नमूद केलं आहे. आष्टी-पाटोदा-शिरूर भागात २२५० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाल्याचेही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
बीड येथे आज भव्य बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हजारो तरुण-तरुणींनी हजेरी लावली. अजित पवार यांनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीड येथील अविनाश साबळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.