कोल्हापूर: त्याच्या मधाळ बोलण्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. तो तिला हॉटेलमध्ये जेवू खाऊ घालू लागला. महागड्या गिफ्टही दिल्या. लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे ते फिरत होते. तो आयुष्यभर आपणाला साथ देईल, अशी तिची अपेक्षा होती; मात्र दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने तिला दूर लोटले. लग्नाच्या आणाभाका करणारा प्रियकर एकदमच पलटला आणि त्याच्या खोट्या प्रेमात अडकलेल्या तरुणीच्या आयुष्याचे वाळवंट झाले. त्याला अद्दल घडवण्यासाठी तिने पोलीस ठाण्याची पायरी चढली. ओळखीच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन वर्षे त्याने शहरातील लॉज, तसेच घरात बोलावून अत्याचार केले. त्यानंतर त्या तरुणीबरोबर लग्न करण्यास नकार देऊन तिला आयुष्यातून उठवणारा प्रियकर व त्याच्या दोन नातेवाइकांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी ही शिरोळ तालुक्यातील आहे. तिचे प्रितीश पोवार (रा. डेबॉन्स कॉर्नर, जयसिंगपूर) याच्याशी प्रेमसंबंध होते. पोवार व ती दोन वर्षांपासून भेटत होते. ‘मी तुझ्याशीच लग्न करणार’ असे सांगून प्रितीश याने तरुणीला हॉटेल, लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. काहीवेळा आपल्या घरात तर मित्रांच्या घरात नेऊनही अत्याचार केले. जुलै २०२२ ते ३१ जुलै, २०२४ या कालावधीत पीडित तरुणीचे लैंगिक शोषण झाले. सध्या ही तरुणी २९ वर्षांची आहे. ती प्रितीश याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती.
मात्र तो आज, उद्या असे म्हणून वेळ मारून नेत होता. शेवटी वैतागलेल्या तरुणीने प्रितीश पोवार याचे नातेवाईक आशिष पोवार व अनिता पोवार यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्यांनीही पीडित तरुणीला विश्वासात घेण्याऐवजी प्रितीश हा दुसरीकडे लग्न करणार आहे. तू त्याचा नाद सोडू दे; अन्यथा आम्ही तुझे घर पेटवून देवू, तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या दिल्या. दोन वर्षे फसवणूक करणारा प्रितीश पोवार हा बदलला आहे. त्याने आपली घोर फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने २७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक हाके यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक माने हे तपास करीत आहेत.
प्रेम नव्हे, शारीरिक आकर्षण
सध्या काही तरुण-तरुणी केवळ शारीरिक आकर्षणातूनच प्रेम करत असतात. हे आकर्षण संपल्यानंतर त्यांच्यात प्रेम राहत नाही. एकमेकांचे गुणदोष समजल्यावर सहवास नकोसा वाटतो. प्रेम करताना प्रियकर मोठमोठ्या थापा मारतो, श्रीमंतीचा आव आणतो; पण खरी परिस्थिती समोर आल्यानंतर प्रेयसीला पश्चात्ताप करावा लागतो. त्यामुळे प्रेमात पडताना या गोष्टींचा सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार केला पाहिजे.
फसू नका, शहाणे व्हा
प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपला हेतू साध्य झाल्यानंतर लाथाडणारे भामटे आज गल्लोगल्ली पिंगा घालतात. त्यामुळे शाळकरी मुली, तरुणींनी आपले शिक्षण, कुटुंबीयांची मानमर्यादा, आपले चारित्र्य याला महत्त्व देणे गरजेचे आहे. क्षणिक मोहात अडकून आयुष्य बरबाद करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. भावनांना आवर घालणारचे यशस्वी होत असतात. त्यामुळे फसू नका, शहाणपणा दाखवा.